जलशुद्धीकरण यंत्र पुरवठादाराचा जिल्हा परिषदेला ठेंगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 01:10 IST2017-08-28T01:10:05+5:302017-08-28T01:10:21+5:30
अकोला: पाणी गुणवत्ता बाधित गावांमध्ये बसवलेल्या जलशुद्धीकरण सयंत्रांपैकी आठ गावातील पाणीपुरवठा बंद झाला आहे. त्यामुळे ज्या उद्देशाने ही सयंत्रे बसवण्यात आली, तोच असफल होत असल्याचे चित्र जिल्हय़ात आहे. विशेष म्हणजे, ज्या पुरवठादाराने ही सयंत्रे बसवली, त्याच्याकडून जिल्हा परिषदेला कुठलीही दाद दिली जात नसल्याचाही प्रकार घडत आहे.

जलशुद्धीकरण यंत्र पुरवठादाराचा जिल्हा परिषदेला ठेंगा
सदानंद सिरसाट ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: पाणी गुणवत्ता बाधित गावांमध्ये बसवलेल्या जलशुद्धीकरण सयंत्रांपैकी आठ गावातील पाणीपुरवठा बंद झाला आहे. त्यामुळे ज्या उद्देशाने ही सयंत्रे बसवण्यात आली, तोच असफल होत असल्याचे चित्र जिल्हय़ात आहे. विशेष म्हणजे, ज्या पुरवठादाराने ही सयंत्रे बसवली, त्याच्याकडून जिल्हा परिषदेला कुठलीही दाद दिली जात नसल्याचाही प्रकार घडत आहे.
राज्याच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाकडून जिल्हय़ातील २0 गावांमध्ये जलशुद्धीकरण यंत्रे मंजूर करण्यात आली. ती यंत्रे बसवताना त्या गावातील पाणी गुणवत्ता बाधित असल्याचा निकष लावण्यात आला; मात्र पाण्याचे स्रोत बाधित असतानाही या शुद्ध पाणीपुरवठय़ासाठी ग्रामस्थांची मागणीच नसल्याची माहिती आहे. त्यामुळे त्या गावात जलशुद्धीकरण सयंत्रांसाठी झालेला खर्च पाण्यात गेला आहे. त्या गावांमध्ये सुरू असलेल्या जलशुद्धीकरण सयंत्रांचा आढावा पाणीपुरवठा व स्वच्छता सहाय्य कक्षाने जिल्हा परिषदेकडून मागवला आहे. त्यामध्ये आठ गावांतील सयंत्रे बंद असल्याचे उघड झाले. त्यातच त्यासंदर्भात संबंधित पुरवठादाराशी जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने संपर्क केला असता तो जुमानत नसल्याचाही प्रकार घडत आहे.
टिटवा, दगडपारव्यात मागणीच नाही!
पाणीस्रोत दूषित असल्याने ज्या गावांमध्ये जलशुद्धीकरण यंत्रे बसवण्यात आली, त्या गावात शुद्ध पाण्याचा वापर ग्रामस्थांनी करावा, यासाठी ही उपाययोजना करण्यात आली; मात्र गावात जलशुद्धीकरण यंत्र असतानाही त्यातील पाणी दोन गावातील ग्रामस्थ वापरतच नसल्याचे आढाव्यात पुढे आले. त्यामध्ये बाश्रीटाकळी तालुक्यातील दगडपारवा आणि टिटवा या दोन गावांचा समावेश आहे. दगडपारवा येथील पुरवठा मे २0१६ पासून बंद आहे. तर टिटवा येथे सुरुवातीपासूनच बंद आहे.
जलशुद्धीकरण सयंत्र बंद असलेली गावे
ग्रामस्थांना शुद्ध पाणीपुरवठय़ासाठी असलेली जलशुद्धीकरण सयंत्रेच बंद असल्याची माहिती पुढे आली आहे. बाश्रीटाकळी तालुक्यातील एरंडा येथे स्रोतातच पाणी नसल्याने शुद्धीकरण बंद आहे. घोटा येथे वीज जोडणीअभावी सयंत्र अद्यापही कार्यान्वित झाले नाही. मूर्तिजापूर तालुक्यातील बपोरी येथे पंप बंद आहे. उमरी येथे अद्यापही पुरवठा सुरू झाला नाही. बोरगाव मंजू येथे थकीत देयकामुळे बंद आहे. कुरणखेड येथे बोअरला पाणी नाही.
दहा ते २५ पैसे लीटरने पुरवठा
ग्रामस्थांना शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्यासाठी जलशुद्धीकरण सयंत्रे आहेत. ग्रामपंचायतींच्या देखरेखीखाली ती चालवली जातात. त्यासाठी ग्रामस्थांकडून शुल्क घेतले जाते. जिल्हय़ातील अनेक गावांमध्ये दहा पैसे लीटर तर काही गावांमध्ये १५ आणि २५ पैसे लीटरप्रमाणे शुल्क घेतले जाते.
पाणीपुरवठा सुरू असलेली गावे
पाणीपुरवठा सुरू असलेल्या गावांमध्ये अकोला तालुक्यातील अंबिकापूर, म्हैसांग, पैलपाडा, वडद बुद्रूक, बाळापूर तालुक्यातील गायगाव, वझेगाव, बाश्रीटाकळी तालुक्यातील कान्हेरी सरप, वडगाव, मूर्तिजापूर तालुक्यातील आरखेड, दातवी, कंझरा, खापरवाडा ही गावे आहेत.
-