राखमिश्रीत दूषित पाणी धरणातून नदीत

By Admin | Updated: January 7, 2015 01:24 IST2015-01-07T00:25:15+5:302015-01-07T01:24:06+5:30

अकोला जिल्ह्यातील पारस वीज निर्मिती प्रकल्पातील प्रकार, पाण्याच्या रासायनिक तपासणीत आढळल्या गंभीर बाबी.

Water from dam dam in Ashimashri, in river | राखमिश्रीत दूषित पाणी धरणातून नदीत

राखमिश्रीत दूषित पाणी धरणातून नदीत

विवेक चांदूरकर /अकोला: पारस येथील वीज निर्मिती प्रकल्पात तयार होणारी ज्वलनशील राख, १६ कोटी रुपये खचरून बांधलेल्या अँश पाँडमध्ये सोडण्याऐवजी, मन नदीवरील धरणात सोडण्यात येत आहे. रसायनयुक्त राखेमुळे ३0 ते ४0 गावांना पाणीपुरवठा करणार्‍या या धरणाचे पाणी दूषित होत असून, हे पाणी नागरिकच नव्हे तर प्राण्यांसाठीही घातक असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. बाळापूर तालुक्यातील पारस येथे महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीचा वीज निर्मिती प्रकल्प आहे. या प्रकल्पात दररोज शेकडो टन राख जमा होते. ही राख एका पाईपद्वारे कोळासा परिसरातील मोठय़ा भूखंडावर द्रव रूपात जमा केली जाते. द्रवरूपात असलेली ही राख या ठिकाणी गोळा करून, त्यातील पाणी वेगळे केले जाते. त्यानंतर उरलेल्या राखेची विक्री केली जाते. पाणी वेगळे करून राख साठविण्याकरिता १६ कोटी रुपयांचा अँश पाँड प्रकल्प येथे उभारण्यात आला आहे. त्या अँश पाँडपर्यंंत पाईपलाइनद्वारे राख पोहोचविण्याकरिता मनारखेडमध्ये पंप हाऊस बांधण्यात आले आहे; मात्र वीज निर्मिती प्रकल्पातून निघालेली राख अँशपाँडपर्यंत पोहोचतच नाही. हे राखमिश्रीत दूषित पाणी पंप हाऊसजवळून एका नालीद्वारे थेट मन नदीवर बांधलेल्या धरणात सोडण्यात येते. त्यामुळे धरणाच्या काठावर सर्वत्र राख साचलेली आहे. या धरणातील पाणी नदीत जाते व नदीतील पाणी परिसरातील मनारखेड, कोळासा, मांडोली, कसुरा, कळंबी, सोनगिरी, हिंगणा व लोहारा या गावांना पुरविले जाते. राखेचे दूषित पाणी धरणात सोडले जात असल्यामुळे मोठय़ा प्रमाणात जल प्रदूषण होत आहे.

         लोकमतने या पाण्याची तपासणी केली असता, पाण्यामध्ये आवश्यकतेपेक्षा ३00 पटीने जास्त गढूळता, २0 पटीने जास्त लोहाचे प्रमाण आढळले आहे. गढूळ व लोहयुक्त पाणी मनुष्याने पिले, तर त्याचा सरळ परिणाम पंचनसंस्थेवर होतो. कालांतराने त्याचे गंभीर आजारात रूपांतर होत असल्याचे डॉ. दीपक मोरे यांनी सांगितले. डायरिया आणि उलट्यांसारखे आजारही या पाण्यामुळे होतात, असे त्यांनी सांगितले. गत दहा महिन्यांपासून राखमिश्रीत पाणी धरणात सोडले जात आहे. या भागात जाण्यास मज्जाव असल्याने, या गंभीर प्रकाराकडे कुणाचेही लक्ष जात नाही.

*धरणातील जैवविविधता धोक्यात

         धरणातील पाण्यामध्ये मासे, प्लवंग, किड तसेच विविध जातीच्या झाडांसह विपूल जैवविविधता असते. कोट्यवधी जीव पाण्यावर जगत असतात. पारस येथे राखेचे दूषित पाणी धरणात सोडल्याने काठावर राखेचे ढीग साचले आहेत. या प्रदुषणामुळे धरणातील मासे कधीचेच नष्ट झाले आहेत. छोट्या-मोठय़ा किड्यांसह एकूणच जैवविविधता यामुळे धोक्यात आली आहे. दरम्यान डॉ दीपक मोरे यांनी पाण्यामध्ये एवढय़ा मोठय़ा प्रमाणात जर गढूळता व लोहाचे प्रमाण असेल तर पाणी पिणार्‍या नागरिकांना डायरिया, उलट्यांचा आजार होऊ शकतो. तसेच जास्त प्रमाणात लोहाचे प्रमाण असले तर पंचनसंस्था बिघडते व त्यातून विविध आजार होण्याची भीती व्यक्त केली.

        यासंबंधी पारस वीज निर्मिती प्रकल्पाचे मुख्य अभियंता रर्वीद्र गोहणे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अँश पॉन्डमध्ये पाणी सोडण्याच्या प्रक्रियेत बिघाड असल्यामुळे धरणामध्ये तात्पुरती व्यवस्था करण्याकरिता हे पाणी सोडण्यात येत असल्याचे सांगीतले. या धरणातून कोणत्याही ठिकाणी पिण्याचे पाणी जात नाही. त्यामुळे कुणालाही धोका नाही. धरण आमचे आहे, आम्हाला त्यात पाणी सोडण्यापासून काहीच हरकत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान ,सामाजिक कार्यकर्ता रामलाल तायडे यांनी प्रकल्पातील दूषित पाणी अँश पाँडमध्ये सोडण्यासाठी पंप हाऊस बांधण्यात आले आहे. हे पंप हाऊस चालविण्याकरिता महिन्याला अडीच लाख रूपयांची देयके काढली जातात. पाणी अँश पाँडऐवजी धरणात जात असेल, तर अडीच लाख रुपयांची देयके कशासाठी काढली जातात, हा प्रश्न उपस्थित केला.

Web Title: Water from dam dam in Ashimashri, in river

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.