६२ हजारांवर शेतकर्‍यांसाठी २७ कोटींची प्रतीक्षा

By Admin | Updated: August 19, 2014 01:21 IST2014-08-19T00:57:10+5:302014-08-19T01:21:11+5:30

पीक विम्याच्या लाभापासून शेतकरी वंचित

Waiting for Rs. 27 crores for 62 thousand farmers | ६२ हजारांवर शेतकर्‍यांसाठी २७ कोटींची प्रतीक्षा

६२ हजारांवर शेतकर्‍यांसाठी २७ कोटींची प्रतीक्षा

अकोला : राष्ट्रीय कृषी विमा योजनेंतर्गत गतवर्षीच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील पीक नुकसानभरपाईपोटी २७ कोटी ७ लाख १२ हजार रुपये पीक विम्याची रक्कम शासनाकडून मंजूर करण्यात आली; मात्र ही रक्कम अद्यापही उपलब्ध झाली नसल्याने, जिल्ह्यातील ६२ हजार ५४३ शेतकरी पीक विम्याच्या लाभापासून वंचित आहेत. त्यामुळे पीक विम्याचा लाभ केव्हा मिळणार, याबाबतची प्रतीक्षा शेतकर्‍यांकडून केली जात आहे. गतवर्षीच्या खरीप हंगामात सतत पाऊस आणि अतवृष्टीमुळे अकोला जिल्ह्यात मूग, उडीद, ज्वारी, तीळ इत्यादी पिकांचे प्रचंड नुकसान झाले. राष्ट्रीय कृषी विमा योजनेंतर्गत जिल्ह्यातील हजारो शेतकर्‍यांनी पिकांचा विमा उतरविला होता. ५२ हजार ९३२ हेक्टरवरील पीक नुकसानीच्या भरपाईपोटी जिल्ह्यातील ६२ हजार ५४३ शेतकर्‍यांसाठी २७ कोटी ७ लाख १२ हजार ५0५ रुपयांची विम्याची रक्कम गेल्या महिन्यात शासनामार्फत मंजूर करण्यात आली. पीक विम्याची मदत मंजूर करण्यात आली असली तरी, कृषी विमा कंपनीकडून विम्याची रक्कम अद्यापही उपलब्ध झाली नाही. यावर्षीचा पावसाळा सुरू होऊन, अडीच महिन्यांचा कालावधी उलटून गेला; मात्र सार्वत्रिक दमदार पाऊस झाला नसल्याने जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यातच गतवर्षीच्या खरीप पिकांच्या नुकसानभरपाईपोटी विम्याची मंजूर रक्कम अद्याप मिळाली नसल्याने, जिल्ह्यातील शेतकरी पीक विम्याच्या लाभापासून वंचित आहेत. त्यामुळे विम्याची रक्कम केव्हा प्राप्त होणार आणि पीक विम्याचा प्रत्यक्ष लाभ केव्हा मिळणार, याबाबतची प्रतीक्षा जिल्ह्यातील शेतकर्‍यांकडून केली जात आहे.

Web Title: Waiting for Rs. 27 crores for 62 thousand farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.