जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या रिक्त जागांच्या निवडणुकीसाठी मतदार यादीचा कार्यक्रम घोषित!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:18 IST2021-03-19T04:18:28+5:302021-03-19T04:18:28+5:30
अकोला: सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या (ओबीसी) जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या १४ आणि सात पंचायत समित्यांच्या २८ जागा रिक्त ...

जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या रिक्त जागांच्या निवडणुकीसाठी मतदार यादीचा कार्यक्रम घोषित!
अकोला: सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या (ओबीसी) जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या १४ आणि सात पंचायत समित्यांच्या २८ जागा रिक्त झाल्या आहेत. राज्य निवडणूक आयोगाने १७ मार्च रोजी दिलेल्या आदेशानुसार जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या रिक्त जागांच्या निवडणुकीसाठी मतदार यादीचा कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील रिक्त जागांच्या निवडणुकीसाठी मतदार यादीचा कार्यक्रम राबविण्यात येणार असून, ५ एप्रिल रोजी प्रारुप मतदार यादी प्रसिध्द करण्यात येणार आहे.
गतवर्षी जानेवारी महिन्यात घेण्यात आलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रवर्गनिहाय आरक्षण ५० टक्क्यांपेक्षा जास्त झाल्याने, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गातून निवडून आलेल्या सदस्यांचे सदस्यत्व रद्द करुन पुन्हा निवडणूक घेण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने ४ मार्च रोजी दिला. त्यानुषंगाने राज्य निवडणूक आयोगाने ५ मार्च रोजी दिलेल्या निर्देशानुसार जिल्ह्यात ‘ओबीसी’ प्रवर्गातील जिल्हा परिषदेच्या १४ सदस्यांसह जिल्ह्यातील सात पंचायत समित्यांच्या २८ सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले असून, रिक्त झालेल्या जागा सर्वसाधारण प्रवर्गातून भरण्यासाठी सर्वसाधारण महिला प्रवर्गाच्या आरक्षणाची सोडत २३ मार्च रोजी काढण्यात येणार आहे. जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या रिक्त जागांच्या निवडणुकीसाठी मतदार यादीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगामार्फत १७ मार्च रोजीच्या आदेशानुसार घोषित करण्यात आला आहे. त्यानुसार जिल्ह्यात रिक्त झालेल्या जिल्हा परिषदेच्या १४ जागा आणि त्याअंतर्गत जिल्ह्यातील सातही पंचायत समित्यांच्या २८ जागांच्या निवडणुकीसाठी मतदार यादीचा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. या रिक्त जागांच्या निवडणुकीसाठी विधानसभेची मतदार यादी वापरण्यात येणार असून, ५ एप्रिल रोजी प्रभागनिहाय प्रारुप मतदार यादी प्रसिध्द करण्यात येणार आहे. प्रारुप मतदार यादीवर ५ ते १२ एप्रिलपर्यंत हरकती सूचना दाखल करता येतील. त्यानंतर २० एप्रिल रोजी अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्यात येणार असून, मतदान केंद्रांची यादी व मतदान केंद्रनिहाय मतदार यादी २८ एप्रिल रोजी प्रसिध्द करण्यात येणार आहे.