महापालिकेत समाविष्ट गावे तहानलेलीच!

By Admin | Updated: May 24, 2017 01:22 IST2017-05-24T01:22:43+5:302017-05-24T01:22:43+5:30

गुडधी : महिला, पुरुषांची पायपीट

The villages included in the municipal corporation! | महापालिकेत समाविष्ट गावे तहानलेलीच!

महापालिकेत समाविष्ट गावे तहानलेलीच!

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणार्थ जिल्हा प्रशासनाने अनेक आराखडे तयार केले असले, तरी शहरालगतची गावे अद्याप तहानलेलीच आहेत. महापालिकेत नव्याने २४ गावांचा समावेश करण्यात आला आहे; पण यातील अनेक गावांतील पाण्याचे स्रोत आटल्याने महिला, पुरुषांना पायपीट करावी लागत आहे. गुडधी गावात तर तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून, पिण्यासाठी गोडे पाणीच उपलब्ध नसल्याने गावकरी त्रस्त आहेत. त्यामुळे गुडधीला तातडीने टँकरने पाणीपुरवठा करण्याची गरज आहे.
अकोला महापालिकेत समाविष्ट करण्यात आलेले गुडधी गाव व लगतची गावे खारपाणपट्ट्यात मोडतात. या गावातील खाऱ्या पाण्याचे हातपंप बंद पडली आहेत. विहिरीत पाणीच नसल्याने या विहिरी कधीकाळीच बुजविण्यात आल्या आहेत. गुडधीचा विस्तार व लोकसंख्या वाढली. तथापि, त्या दृष्टीने गोड्या पाण्याचे नियोजन नसल्याने येथील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
कृती आराखड्याच्या माध्यमातून कामे केली असली, तरी शहरालगतच्या खारपाणपट्ट्यातील गावांना याचा कोणताच फायदा झालेला नाही. यामध्ये गुडधी, यावलखेड, चाचोंडी आदी गावांचा समावेश आहे. गुडधी गावातील सार्वजनिक विहिरी बंद पडल्या आहेत. त्यामुळे सर्व भिस्त हातपंपांवर आहे; पण पाण्याची पातळी घसरल्याने अनेक हातपंपांना पाणी नाही. रेल्वे प्रशासनाने रेल्वे गेटनजीक हातपंप लावला होता, तोही बंद आहे. त्यामुळे पाण्यासाठी नागरिकांची ओढाताण सुरू आहे. गुडधी गावाला गोडे पाण्याचा स्रोत अद्याप सुरू झाला नसून, याबाबत दखल घेण्याची गरज आहे. नळ योजनेला विलंब होत असल्याने प्रशासनाने या गावासाठी पाण्याचा टँकर सुरू करण्याची गरज आहे.

जल विना जलवाहिनी
गुडधी येथे कोट्यवधी रुपयांची जलवाहिनी टाकण्यात आली आहे; पण ग्रामपंचायतच्या काळात पाणीपुरवठा सुरू झाला नाही. महापालिका क्षेत्रात हे गाव गेल्याने पाणीपुरवठा सुरू होईल, अशी अपेक्षा आहे; पण नळ जोडणीसाठी लागणारी रक्कम मोठी आहे. एवढा पैसा भरणे शक्य नसल्याने अनेकजण या योजनेपासून वंचित आहेत. 

Web Title: The villages included in the municipal corporation!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.