मृत्यूच्या भीतीने ग्रामस्थ गाव सोडण्याच्या तयारीत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2017 01:04 IST2017-08-25T01:04:31+5:302017-08-25T01:04:39+5:30
मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील अतिसंरक्षित क्षेत्रात असलेल्या बारुखेडा व नागरतास या दोन आदिवासीबहुल गावांचे पुनवर्सन वारी हनुमान येथे करण्यात आले; परंतु तेथे या गावांमधील आदिवासी रहिवाशांना गावात आवश्यक असणार्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या नाहीत. परिणामी, वारी हनुमान येथे पुनर्वसन झाल्यापासून या दोन गावातील लहान-मोठय़ा ७७ ग्रामस्थांचे मृत्यू झाल्याने गावात घबराट निर्माण झाली आहे.

मृत्यूच्या भीतीने ग्रामस्थ गाव सोडण्याच्या तयारीत!
सदानंद खारोडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
तेल्हारा : मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील अतिसंरक्षित क्षेत्रात असलेल्या बारुखेडा व नागरतास या दोन आदिवासीबहुल गावांचे पुनवर्सन वारी हनुमान येथे करण्यात आले; परंतु तेथे या गावांमधील आदिवासी रहिवाशांना गावात आवश्यक असणार्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या नाहीत. परिणामी, वारी हनुमान येथे पुनर्वसन झाल्यापासून या दोन गावातील लहान-मोठय़ा ७७ ग्रामस्थांचे मृत्यू झाल्याने गावात घबराट निर्माण झाली आहे.
तेल्हारा तालुक्यातील बारुखेडा व नागरतास या दोन गावांचे पुनर्वसन सन २0११ ते २0१५ मध्ये वारी हनुमान येथे करण्यात आले. त्यावेळी वन विभागाच्या अधिकार्यांनी सदर नागरिकांना पुनर्वसन झालेल्या गावात मूलभूत सोयी व उदरनिर्वाहाचे साधन उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते. त्या पुनर्वसित प्रत्येक कुटुंबाला जमीन पाहून नियमाप्रमाणे मदत देण्यात येईल, असे सांगून सदर गावाचे पुनर्वसन केले; पण सध्या बारुखेडा व नागरतास या दोन्ही गावात मूलभूत सुविधा नाहीत.
बारुखेडा येथे दोन कूपनलिका असून, त्याही एक महिन्यापासून बंद आहेत. येथील ग्रामसेवक एक-एक महिना गावात येत नसल्याने आदिवासी नागरिकांना शासकीय योजनांची माहिती मिळत नाही. येथे आरोग्यसेवाही उपलब्ध नाही. येथे कोणतेही कार्यालय नसल्याने येथे महिन्यातून एक वेळा नर्स येते. आजारी असलेल्यांना औषधे, गोळ्या मिळत नाहीत. येथील मुलांना चांगले शिक्षणही मिळत नाही. येथील रहिवासी बुडाबाबा बेढेकर यांची १६ एकर शेती होती. त्यांना केवळ आतापर्यंत केवळ दोन लाख रुपयांची शासकीय मदत मिळाली. अनेकांना घरासाठी अजूनही पैसा मिळाला नाही. येथील मजुरांना पुरेशी मजुरी मिळत नसल्याने अनेकांनी गाव सोडले. येथील रामकली बुडा बेठेकर या एकाच कुटुंबातील रामकली बेठेकर, बुडा बेठेकर, अशोक बुडा बेठेकर, सुकचंद बुडा, खुशी मुन्ना बेठेकर, लखन मुन्ना बेठेकर, अनुस मुन्ना बेठेकर या सात जणांचा अलीकडेच मृत्यू झाला. बारुखेड्यात पाच वर्षांत ६४ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. नागरतास येथे १३ लोकांचा मृत्यू झाला. सदर प्रकारामुळे दोन्ही गावांमधील ग्रामस्थ भयभीत झाले आहेत.
आम्ही यापूर्वी नदीचे पाणी पित होतो, तेव्हा हा प्रकार नव्हता; मात्र येथे आल्यानंतर कूपनलिकेचे पाणी पित असल्याने मृत्यूचे प्रमाण वाढल्याचे विनायक मंगल काकडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. त्यामुळे आम्ही येथे वास्तव्य केल्यास येत्या काही दिवसांत एकही आदिवासी जिवंत राहणार नसल्याची भीती त्यांनी व्यक्त केली. आम्हाला तत्कालीन शासकीय अधिकार्यांनी वेगवेगळी आमिषे दाखवून गाव सोडण्यास बाध्य केले; परंतु या दोन्ही गावात शासनाने मूलभूत सुविधा उपलब्ध केल्या नसल्याने दोन्ही गावातील आदिवासी बांधव पुढील महिन्यात जुन्या गावातच मुक्कामी जाणार असल्याचे येथील ग्रामस्थांनी सांगितले.
शासनाने पुनर्वसित गावात आरोग्यसेवा, रोजगार, ग्रामपंचायत व पिण्यास चांगले पाणी उपलब्ध करून दिले नाही. परिणामी, या पुनर्वसित गावामध्ये पाच वर्षांत ६४ आदिवासी ग्रामस्थांचा मृत्यू झाल्याने आम्ही पुन्हा जुन्या गावात जाणार आहोत.
- तुकाराम मंगल काकडे, आदिवासी, बारुखेडा.