पातुर नंदापूर येथील नदीपात्रात सुरू असलेला गावठी दारूचा अड्डा उद्ध्वस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:18 IST2021-05-08T04:18:31+5:302021-05-08T04:18:31+5:30
पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल अकोला : पिंजर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या पातूर नंदापूर येथे नदीपात्रात अवैधरीत्या सुरू असलेला ...

पातुर नंदापूर येथील नदीपात्रात सुरू असलेला गावठी दारूचा अड्डा उद्ध्वस्त
पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल
अकोला : पिंजर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या पातूर नंदापूर येथे नदीपात्रात अवैधरीत्या सुरू असलेला गावठी दारू अड्डा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या विशेष पथकाने शुक्रवारी उद्ध्वस्त केला. दारूची अवैधरीत्या निर्मिती करणाऱ्या पाच जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरुद्ध पिंजर पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पातुर नंदापूर येथील नदीपात्रात भगवान उत्तम भगत, विलास भीमराव खरात, प्रशांत सखाराम खंडारे, नीलेश रमेश इंगळे व बबन वाकपांजर हे पाच जण गावठी दारूची मोठ्या प्रमाणात अवैधरीत्या निर्मिती करीत असल्याची माहिती पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख विलास पाटील यांना मिळाली. या माहितीवरून पाटील यांनी पथकासह सापळा रचून शुक्रवारी दुपारी छापा टाकला. या ठिकाणावरील पाचही आरोपींना अटक करण्यात आली. नदीपात्रातून ६० हजार रुपयांचा अवैध मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या पाचही जणांविरुद्ध पिंजर पोलीस ठाण्यात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक मोनिका राऊत, शहर पोलिस उपाधीक्षक सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाचे प्रमुख विलास पाटील व त्यांच्या पथकाने केली.
गांजाच्या शेतीनंतर दारूचा कारखाना
पिंजर पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही दिवसांपूर्वीच गांजाची शेती उघड झाली होती. त्यानंतर आता नदीपात्रात सुरू असलेल्या अवैध गावठी दारूचा अड्डा पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाने उद्ध्वस्त केल्याने या परिसरात अवैध धंदे मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे वास्तव आहे.