विदर्भात लागले पहिले ‘गार रोधक’ यंत्र
By Admin | Updated: March 24, 2015 00:31 IST2015-03-24T00:31:38+5:302015-03-24T00:31:38+5:30
नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यास मिळणार बळ; खामगाव तालुक्यातील हिवरखेड येथील कास्तकाराचा प्रयोग.

विदर्भात लागले पहिले ‘गार रोधक’ यंत्र
अनिल गवई / खामगाव (जि. बुलडाणा): नैसर्गिक आपत्तीमुळे शेती उत्पादनात वारंवार घट होत असल्याने खामगाव तालुक्यातील प्रगतीशील कास्तकार दादाराव हटकर यांनी आपल्या शेतात ह्यगार रोधकह्ण यंत्र (स्केलर वेव्ह जनरेटर) बसविले आहे. गारांचे पावसात रुपांतर झाल्याने या यंत्रामुळे २८ फेब्रुवारी ते १ मार्च दरम्यान आलेल्या नैसर्गिक आपत्तीपासून या शेतकर्याच्या शेतीतील शेकडो एकरावरील पिकांचे नुकसान टळले आहे. विदर्भातील शेतीत प्रथमच हा प्रयोग करण्यात आला आहे.
स्कॅलर वेव्ह जनरेटर या यंत्रणेत स्कॅलर लहरी आकाशात सोडल्या जातात. गारपिटीसारख्या नैसर्गिक आपत्तीच्यावेळी या यंत्राची ढगाच्या दिशेने सेटींग केल्यास गारा तयार होण्याची प्रक्रीया थांबविता येते. तसेच या यंत्रामुळे संत्र्याच्या आकारातील गारांचे अतिशय लहान गारांमध्ये रुपांतर होते. याशिवाय पावसाच्या वेगावर नियंत्रण मिळविता येणे शक्य होते. या बहुपयोगी यंत्राबाबत माहिती मिळाल्यानंतर दादाराव हटकर यांनी पुणे येथील शास्त्रज्ञांकडून ड्रिझलर (स्कॅलर वेव्ह जनरेटर) यंत्राबाबत बोलणी करुन गत महिन्यातच हे यंत्र आपल्या हिवरखेड शिवारातील शेतात बसविले. या यंत्रामुळे मार्च महिन्याच्या सुरुवातीला आलेल्या गारपिटीवर नियंत्रण मिळविल्याचा अनुभव आपण घेतला असल्याचे दादाराव हटकर यांचे बंधू रमेश हटकर यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
*यंत्राला विजेची आवश्यकता नाही
स्कॅलर वेव्ह जनरेटर या यंत्रात तांबे, अँल्युमिनियम, लोखंड यासारख्या धातुंचा वापर केला आहे. हे यंत्र धातू विश्वातील स्कॅलर एनर्जी शोषून घेतात. या यंत्रासाठी विजेची आवश्यकता नाही. यंत्रांची वायर जमिनीला जोडली असता यंत्र सुरू होते. वजन ५0 किलोपर्यंत असल्यामुळे हे यंत्र हलविण्यास सोपे आहे. लहरी निघणार्या सर्व दिशेने पाईप फिरविता येत असल्याने हाताळण्यास हे यंत्र अतिशय सुलभ आहे.
*गारांवर नियंत्रण मिळविता येते
हे यंत्र चालू केल्यानंतर ढगांची दिशा, वेग याचा अंदाज घेवून यंत्राची दिशा ठरवता येते. यंत्राच्या नळीतून स्कॅलर लहरी निघून आकाशात जातात. तेथे ढगांबरोबर अभिक्रिया झाल्यानंतर छोटे ढग विरघळतात व मोठय़ा ढगांचा भाग होवून जातात. त्यामुळे मोठय़ा ढगांचा आकार वाढतो. ढगांचा विद्युत भार वाढतो. गारा पडणार्या दिशेने यंत्र केल्यास ढग विरळ होतो. त्यामुळे गारांवर नियंत्रण मिळविता येते.