विदर्भाची शेती १८ लाख बैलांच्या खांद्यावर
By Admin | Updated: August 25, 2014 02:25 IST2014-08-25T02:13:15+5:302014-08-25T02:25:12+5:30
पोळा दिन विशेष : आजही बैलांवरच शेतीची भिस्त

विदर्भाची शेती १८ लाख बैलांच्या खांद्यावर
नीलेश शहाकार / बुलडाणा
जीवा-शिवाची ही बैल जोड.जाई बिगीनं आपली पुढं.या गाण्याचे कडवे कानावर पडताच, आपल्या डोळ्यासमोर एका सुंदर बैलजोडीचे दृश्य येते. आज आधुनिक शेतीबद्दल बरेच बोलले जात असले तरी शेतकर्यांच्या कुटुंबाचा परीघ बैलजोडीशिवाय पूर्ण होत नाही. त्यामुळेच या यंत्रयुगातही १८ लाख बैल आपल्या खांद्यावर विदर्भात कृषी क्षेत्राची भिस्त सांभाळत आहे .
कृषिप्रधान देशात बैल हाच शेतीचा प्रमुख घटक मानला जातो. शेतीकामासाठी अत्यंत उपयुक्त असलेल्या या जनावरांना अगदी पोटच्या मुलाप्रमाणे सांभाळणे, ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. त्यामुळे अपार कष्ट करणार्या या मुक्या जनावरांची शासनाकडूनही नोंदणी ठेवली जाते. पशुगणना अहवालानुसार राज्यात ७६ लाख ३0 हजार ९२0 बैल असताना केवळ ५४ लाख बैल शेतातील कामासाठी जुंपले जातात.
मशागतीचे क्षेत्र कमी झाल्याने बैलजोडी पाळणे परवडत नाही. वर्षातून दोन वेळा मशागत करण्यासाठी रोटावेटर, लहान ट्रॅक्टरचा वापर करणे सोयीस्कर होऊ लागले आहे. त्यासाठी वर्षभर त्यांना सांभाळणे आर्थिकदृष्ट्या न परवडणारे वाटत असल्याने शेतकरी मोठय़ा प्रमाणात यांत्रिकीकरणाकडे वळला आहे. मात्र, असे असले तरीही या मुक्या जनावरांशी असलेले नाते तो तोडू शकलेला नाही.
राज्यातील एकूण बैलांपैकी १ लाख ७३ हजार ४९५ बैल प्रजोत्पादनासाठी वापरले जातात. तर ४ लाख १९ हजार १३४ बैलांचा केवळ बैलगाडीला जुंपून वाहतूक करण्यासाठी वापर केला जातो. तर ८७ हजार ३८८ बैल मोकाट असल्याची नोंद आहे. विदर्भातील अकरा जिल्ह्यात २७ लाख १७ हजार बैलांची नोंदणी आहे.
यापैकी १७ लाख ९९ हजार बैलांचा शेतीसाठी वापर केला जात आहे.
जिल्हा एकूण बैल कृषीसाठी वापर
अकोला १,५२,७८२ १,0१४८२
अमरावती २,५३,८९0 १,७२,५६६
भंडारा १,२९,६१६ ९२,0७९
बुलडाणा ३,0४,५00 २,0६,११८
चंद्रपूर ३,४३,९७५ २,४१,७९0
गडचिरोली ३,६६,९३८ २,२२,५५0
गोंदिया २,२६,८११ १,६२,९0२
नागपूर २,४५,८३४ १,७३,९१७
वर्धा १,५४,९३६ १,0७,२१८
वाशिम १,६८,८३७ १,११,१0७
यवतमाळ ३,६८,९६0 २,0७,७00