शैक्षणिक सत्र संपण्याच्या मार्गावर; ‘स्वाधार’चा निधी प्रलंबितच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2020 03:08 PM2020-03-08T15:08:16+5:302020-03-08T15:08:26+5:30

‘स्वाधार’ योजनेंतर्गत पात्र विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात भत्त्याची रक्कम केव्हा जमा होणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

On the verge of ending the academic session; 'Swadhar' fund is pending! | शैक्षणिक सत्र संपण्याच्या मार्गावर; ‘स्वाधार’चा निधी प्रलंबितच!

शैक्षणिक सत्र संपण्याच्या मार्गावर; ‘स्वाधार’चा निधी प्रलंबितच!

Next

- संतोष येलकर
अकोला: यावर्षीचे शैक्षणिक सत्र संपण्याच्या मार्गावर असताना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेंतर्गत राज्यातील विद्यार्थ्यांना निवास, भोजन व निर्वाह भत्ता वितरित करण्यासाठी शासनाकडून निधी प्राप्त होणे अद्याप प्रलंबितच आहे. त्यामुळे ‘स्वाधार’ योजनेंतर्गत पात्र विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात भत्त्याची रक्कम केव्हा जमा होणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेंतर्गत इयत्ता दहावीनंतर उच्च शिक्षण घेण्यासाठी अनुसूचित जातीमधील ज्या विद्यार्थ्यांना जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी वसतिगृहात प्रवेश मिळाला नाही, अशा विद्यार्थ्यांना निवास, भोजन व निर्वाहाचा खर्च भागविण्यासाठी प्रति वर्ष ५१ हजार रुपये भत्ता वितरित करण्यात येतो. वर्षातून दोनदा भत्त्याची रक्कम विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येते; मात्र २०१९-२० यावर्षीचे शैक्षणिक सत्र संपण्याच्या मार्गावर असताना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना निवास, भोजन व निर्वाह भत्ता वितरित करण्यासाठी शासनाकडून अद्याप राज्यातील जिल्हा स्तरावर निधी प्राप्त झाला नाही. निधी प्रलंबित असल्याने, राज्यातील सर्वच जिल्ह्यांत डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना भत्त्याचे वितरण रखडले आहे. त्यामुळे ‘स्वाधार’ योजनेंतर्गत शासनाकडून निधी केव्हा उपलब्ध होणार आणि निवास, भोजन व निर्वाह भत्त्याची रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यात केव्हा जमा होणार, यासंदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेंतर्गत शासनाकडून लवकरच निधी प्राप्त होणार आहे. निधी प्राप्त झाल्यानंतर निवास, भोजन व निर्वाह भत्त्याची रक्कम पात्र विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.
-विजय साळवे,
प्रादेशिक उपायुक्त, समाजकल्याण विभाग, अमरावती.

 

Web Title: On the verge of ending the academic session; 'Swadhar' fund is pending!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Akolaअकोला