उत्तर प्रदेशातील अट्टल चोरट्यांच्या टोळीला ठोकल्या बेड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:17 IST2021-02-05T06:17:08+5:302021-02-05T06:17:08+5:30
अकोला : गीतानगरमध्ये घरफोडी करणाऱ्या आरोपींचा शोध घेण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले. पोलिसांनी उत्तर प्रदेशातून तीन आरोपींना ...

उत्तर प्रदेशातील अट्टल चोरट्यांच्या टोळीला ठोकल्या बेड्या
अकोला : गीतानगरमध्ये घरफोडी करणाऱ्या आरोपींचा शोध घेण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले. पोलिसांनी उत्तर प्रदेशातून तीन आरोपींना अटक केली.
१८ नोव्हेंबर रोजी एकाच दिवशी गीतानगरातील भारतीया भवनजवळील रहिवासी लखन संतोष शर्मा, खुशाल दिलीपराव नेमाडे व आशिष मनोहर यांच्या घरामध्ये चोरी झाली होती. चोरट्यांनी घरातील लॉकर तोडून त्यामधील सोन्या-चांदीचे दागिने व नगदी, असा एक लाख सात हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला होता. याप्रकरणी जुने शहर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला होता. या घटनेचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शैलेश सपकाळ यांच्या मार्गदर्शनात करण्यात आला. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून व तांत्रिक विश्लेषणावरून गुन्ह्यातील आरोपी हे उत्तर प्रदेशातील असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांचे एक पथक पीएसआय सागर हटवार यांच्या मार्गदर्शनात उत्तर प्रदेश येथे गेले होते. पोलिसांनी मो. रशीद ऊर्फ मुन्ना मोहम्मद साहिल (वय २३, रा. आवाज विकास कॉलनी, हापुड उत्तर प्रदेश), शान ऊर्फ शानू मोहम्मद सलीम (वय ३० वर्ष, रा. कांदला, जि. मुजफ्फरनगर) व मोहम्मद मोहसीन ऊर्फ काला मोहम्मद सगीर (वय २३ वर्ष, रा. हापुड, उत्तर प्रदेश) यांना वेगवेगळ्या ठिकाणांहून ताब्यात घेतले. या आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून, त्यांच्याकडून पोलिसांनी सोन्या-चांदीचे दागिने, १ लाख ११ हजार ७८७ रुपये, गुन्ह्यात वापरलेले वाहन, असा सहा लाख ११ हजार ७८७ रुपयांचा ऐवज जप्त केला.