अनधिकृत बांधकाम; मुदत संपली
By Admin | Updated: June 1, 2017 01:36 IST2017-06-01T01:36:04+5:302017-06-01T01:36:04+5:30
बिल्डर लॉबीचे म्होरके नवीन जुगाडाच्या प्रयत्नात

अनधिकृत बांधकाम; मुदत संपली
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : महानगरपालिका नगररचना विभागतर्फे तत्कालीन आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी बजाविलेल्या १८६ अनधिकृत बांधकाम करणाऱ्या बिल्डरला देण्यात आलेली ६० दिवसांची मुदत संपुष्टात आली आहे. त्यामुळे आता बिल्डर लॉबीचे म्होरके काही नवीन जुगाड करता येतो काय, याच प्रयत्नात आहेत. ३१ मेपर्यंत बिल्डरला यासंदर्भात मुदत देण्यात आली होती.
अकोला शहरात बांधकाम करणाऱ्या १८६ लोकांना नोटिस बजावून ३१ मेपर्यंत मुदत देण्यात आली होती. त्या नोटिसला न जुमानता अनेकांनी आपले बांधकाम सुरूच ठेवले. अवैध बांधकाम करणाऱ्या इमारतींवर आता महापालिका अतिक्रमण हटाव पथकाकडून कारवाई होण्याचे संकेत आहेत. वेळप्रसंगी अनेकांवर फौजदारी कारवाईदेखील होण्याची शक्यता आहे.
महानगरपालिकेच्या नगररचना विभागद्वारा मंजूर नकाशाच्या चारपटीने जास्त बांधकाम करण्यात आले. तत्कालीन महापालिका आयुक्त डॉ. कल्याणकर यांनी सर्वांना नोटिस बजावून काम बंद करण्याचे निर्देश दिले होते. दरम्यान, विद्यमान महापालिका आयुक्त अजय लहाने यांनीदेखील तीच री पुढे ओढून शहरातील बिल्डरांना बांधकाम न करण्याचा दम दिला. यानंतर अनेक ठिकाणी शहरामध्ये अपार्टमेंट, हॉस्पिटल, खासगी इमारती आणि व्यापारी संकुलांचे बांधकाम सुरूच राहिले.
महापौर विजय अग्रवाल आणि मनपा आयुक्त अजय लहाने यांनी ‘क्रेडाई’ पदाधिकाऱ्यांची आणि १८६ बांधकाम करणाऱ्यांची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात बोलाविली होती. त्यात ३१ मेपर्यंत अवधी देण्यात आला होता; मात्र त्याचा लाभ कुणाला घेता आलेला नाही. नवीन ‘एफएसआय’नुसार नकाशा मंजुरीसाठी टाकणाऱ्यांची संख्या वाढली नाही.