उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी सेना नेत्यांची मांदियाळी

By Admin | Updated: June 16, 2017 00:34 IST2017-06-16T00:34:36+5:302017-06-16T00:34:36+5:30

शिवणी विमानतळाबाहेर शिवसैनिकांची गर्दी

Uddhav Thackeray's invitation to army leaders | उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी सेना नेत्यांची मांदियाळी

उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी सेना नेत्यांची मांदियाळी

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : शेगाव येथे शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यासाठी शिवणी विमानतळावर दाखल झालेले पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी सेना नेत्यांची मांदियाळी जमल्याचे चित्र गुरुवारी पाहावयास मिळाले, तसेच विमानतळाबाहेर शिवसैनिकांनी चांगलीच गर्दी केली होती.
पश्चिम विदर्भात शिवसेनेची नव्याने बांधणी करण्यासाठी सेना नेत्यांनी लक्ष केंद्रित केल्याचे दिसून येत आहे. शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून पक्षाची संघटनात्मक बांधणी करण्यासह शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे १५ मे रोजी अकोल्यात दाखल झाले होते. त्यावेळी अकोला, अमरावती आणि बुलडाणा जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला होता. बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव येथे गुरुवारी (१५ जून) शिवसेना पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला असता मेळाव्याला संबोधित करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दाखल झाले. सकाळी ११ वाजता उद्धव ठाकरे यांचे शिवणी विमानतळावर आगमन होताच पश्चिम विदर्भाचे संपर्क प्रमुख तथा खासदार अरविंद सावंत, परिवहन मंत्री दिवाकर रावते, राज्यमंत्री संजय राठोड, खासदार भावना गवळी, आमदार गोपीकिशन बाजोरिया, जिल्हाप्रमुख नितीन देशमुख, चंद्रपूर येथील आ. बंडूभाऊ धानोरकार, सहायक संपर्क प्रमुख श्रीरंग पिंजरकर यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. यावेळी उपजिल्हाप्रमुख बंडूभाऊ ढोरे, दिलीप बोचे, रवींद्र पोहरे, जि.प. सदस्य महादेवराव गवळे, जिल्हा महिला संघटिका ज्योत्स्ना चोरे, सुनीता मेटांगे, अकोला पूर्वचे शहर प्रमुख अतुल पवनीकर, अकोला पश्चिमचे शहर प्रमुख राजेश मिश्रा, तालुका प्रमुख विकास पागृत, अ‍ॅड. अनिल काळे, नगरसेवक शशी चोपडे, गजानन चव्हाण, उपशहर प्रमुख अभिषेक खरसाडे, प्रदीप गुरुखुद्दे, संतोष अनासने, अश्विन नवले, सागर भारुका, अश्विन पांडे, बंडू सवाई, नकुल ताथोड, संजय भांबेरे, सुरेंद्र विसपुते, राहुल कराळे, योगेश बुंदेले व दीपक बोचरे आदी उपस्थित होते.
दुपारी २ वाजता मेळावा आटोपल्यानंतर ३.३० वाजता उद्धव ठाकरे अकोला विमानतळावरून मुंबईकडे रवाना झाले.

विमानतळाबाहेर विषारी ‘फुरसे’ साप
- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे येणार असल्यामुळे पोलिसांच्यावतीने विमानतळावर आणि बाहेर चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळी विमानतळाबाहेर लावलेल्या शोभिवंत झाडात साप असल्याचे उपस्थित पोलिसांना आढळून आले. खदान पोलीस ठाण्याचे ठाणेदार गजानन शेळके यांनी त्वरित सर्पमित्र बाळ काळणे यांना भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता काळणे यांनी सर्पमित्र संतोष वाकोडे यांना विमानतळावर पाठविले.

- झाडात लपून बसलेला अवघ्या १५ इंचाचा साप पकडून बाहेर काढला असता, तो विषारी ‘फुरसे’ (सॉसकेल्ड वायपर) असल्याचे समोर आले. या सापाने दंश केल्यानंतर अवघ्या १५ ते २० मिनिटांत माणसाचा मृत्यू होत असल्याचे बाळ काळणे यांनी सांगितले.

Web Title: Uddhav Thackeray's invitation to army leaders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.