हिवरखेड येथे मांडूळ सापाची तस्करी करणारे दोघे गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2020 16:10 IST2020-10-12T16:10:08+5:302020-10-12T16:10:21+5:30
अमोल महादेव हिवराळे (२८) व लक्ष्मण राजू खिरोळकर (२२) रा. वडोदा, ता. मुक्ताई नगर, जि. जळगाव यांना अटक करण्यात आली.

हिवरखेड येथे मांडूळ सापाची तस्करी करणारे दोघे गजाआड
अकोट : मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत अकोट वन्य जीव विभागातील हिवरखेड येथे दुर्मीळ मांडूळ सापाची तस्करी करणाऱ्या दोघांना पकडल्याची घटना शनिवारी सायंकाळच्या सुमारास घडली. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे, मेळघाट व्याघ्र प्रकल्प सायबर क्राइम सेलचे अधिकारी व अकोट वन्य जीव विभागातील अधिकारी यांनी संयुक्तरित्या छापा टाकला. हिवरखेड येथील इसार पेट्रोल पंपाजवळ रचलेल्या सापळ््यामध्ये सायंकाळी ६ ते ६.३० वाजता आरोपी नामे अमोल महादेव हिवराळे (२८) व लक्ष्मण राजू खिरोळकर (२२) रा. वडोदा, ता. मुक्ताई नगर, जि. जळगाव यांना अटक करण्यात आली. मांडूळ तस्करी प्रकरणातील इतर आरोपी हे अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले. याप्रकरणी आरोपींशिवाय ९ जणांचा सहभाग आहे. आरोपींना न्यायालयात हजर केले असता आरोपींना १३ आॅक्टोबरपर्यंत वनकोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास विश्वनाथ चव्हाण, वन परीक्षेत्र अधिकारी फिरते पथक, एम.एस. रेड्डी, अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक मेळघाट प्रकल्प अमरावती व उप वनसंरक्षक एस नवकिशोर रेड्डी, अकोट वन्यजीव विभाग करीत आहे.