दोन लाख क्विंटल तुरीचे मोजमाप बाकी!
By Admin | Updated: June 1, 2017 01:29 IST2017-06-01T01:29:35+5:302017-06-01T01:29:35+5:30
‘नाफेड’द्वारे खरेदी बंद : शेतकऱ्यांना ‘टोकन’

दोन लाख क्विंटल तुरीचे मोजमाप बाकी!
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : हमीदराने ‘नाफेड’द्वारे तूर खरेदीची मुदत संपल्याने, बुधवारी सायंकाळपासून जिल्ह्यातील ‘नाफेड’च्या पाचही खरेदी केंद्रांवर तूर खरेदी बंद करण्यात आली; मात्र खरेदी केंद्रांवर नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांच्या १ लाख ९२ हजार क्विंटल तुरीचे मोजमाप अद्याप बाकी आहे. मोजमाप बाकी असलेली तूर खरेदी करण्यासाठी तूर उत्पादक शेतकऱ्यांना ‘टोकन’ देण्यात आले असून, या तुरीची खरेदी करण्यात येणार आहे.
शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत हमीदराने ‘नाफेड’द्वारे तूर खरेदी गत २२ एप्रिल रोजी बंद करण्यात आली होती. त्यानंतर खरेदी केंद्रांवर मोजमाप बाकी असलेल्या तुरीचे पंचनामे करून शासनामार्फत तूर खरेदी सुरू करण्यात आली होती. दरम्यान, गत ९ मेपासून ‘नाफेड’द्वारे पुन्हा तूर खरेदी सुरू करण्यात आली. नाफेडद्वारे तूर खरेदीत जिल्ह्यातील अकोला, बार्शीटाकळी, अकोट, तेल्हारा व मूर्तिजापूर या पाचही खरेदी केंद्रांवर गत २२ एप्रिल ते ३१ मेपर्यंत ८० हजार क्विंटल तूर खरेदी करण्यात आली. नाफेडद्वारे तूर खरेदीची मुदत ३१ मे रोजी सायंकाळी संपुष्टात आली. ‘नाफेड’द्वारे तूर खरेदीची मुदत संपली असली, तरी खरेदी केंद्रांवर नोंदणी केलेल्या १ लाख ९२ हजार क्विंटल तुरीचे मोजमाप अद्याप बाकी आहे. त्यामुळे मोजमाप बाकी असलेल्या १ लाख ९२ हजार क्विंटल तुरीची खरेदी करण्यासाठी तूर उत्पादक शेतकऱ्यांना ‘टोकन’ देण्यात आले आहे. टोकन देण्यात आलेल्या तूर उत्पादक शेतकऱ्यांच्या तुरीचे मोजमाप करण्यात येणार आहे.
अकोल्यात पाच हजारांवर प्रतीक्षेत!
नाफेडद्वारे तूर खरेदीत अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती या खरेदी केंद्रावर अकोला, बाळापूर व पातूर या तीन तालुक्यांतील तूर खरेदी करण्यात येत आहे. या केंद्रावर ३१ मेपर्यंत नोंदणी केलेल्या ५ हजार ५०० शेतकऱ्यांच्या १ लाख ३५ हजार क्विंटल तुरीचे मोजमाप अद्याप बाकी आहे. नाफेडद्वारे तूर खरेदीची मुदत संपल्यानंतर मोजमापाच्या प्रतीक्षेत असलेल्या ५ हजार ५०० तूर उत्पादक शेतकऱ्यांना ‘टोकन’ देण्यात आले असून, टोकन दिलेल्या तुरीची खरेदी करण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील पाचही खरेदी केंद्रांवर नोंदणी केलेल्या मात्र मोजमाप बाकी असलेल्या शेतकऱ्यांची १ लाख ९२ हजार क्विंटल तूर खरेदी करण्यासाठी ‘टोकन’ देण्यात आले आहेत. टोकन देण्यात आलेल्या तुरीची खरेदी करण्यात येणार आहे.
-आस्तिककुमार पांडेय,
जिल्हाधिकारी.