दगडपारवा धरणाचे दोन दरवाजे उघडले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 12:06 IST2019-11-02T12:06:30+5:302019-11-02T12:06:37+5:30
धरण बांधले तेव्हापासून २00६ नंतर यावर्षी या धरणातून पाणी सोडण्यात आले आहे.

दगडपारवा धरणाचे दोन दरवाजे उघडले!
अकोला : बार्शिटाकळली तालु्क्यातील दगडपारवा धरणात शंभर टक्के जलसाठा संचयित झाल्याने शुक्रवारी रात्री ८.३० वाजता या धरणाचे दोन दरवाजे ५ से.मी.ने उघडण्यात आले असून,मोर्णा नदी काठच्या गावकऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. अकोला पूर सरंक्षण योजनेतंर्गत हे धरण बांधण्यात आले आहे.धरण बांधले तेव्हापासून २00६ नंतर यावर्षी या धरणातून पाणी सोडण्यात आले आहे. दरम्यान,काटेपूर्णा धरणही ९९ टक्केपर्यंत पोहाचले असून, रात्री हे धरण केव्हावी शंभर टक्के भरण्याची शक्यता असल्याने काटेपूर्णा धरणातूनही पाणी सोडण्याची शक्यता पाटबंधारे विभागाच्या अभियंत्यांनी वर्तवली आहे.
सप्टेबर महिन्यापासून जिल्ह्यात सतत पाऊस सुरू असून,आॅक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पावसाचा वेग वाढल्याने जिल्ह्यातील सर्वच मध्यम व मोठ्या धरणातील जलसाठा वाढला असून, अकोला शहराची जीवनरेखा काटेपूर्णा धरणात शंभर टक्के जलसंचय झाला आहे.दगडपारवा हे धरणही प्रथमच शंभर टक्के पाण्याने भरले असून,शुक्रवारी रात्री ८.३० वाजतापासून यातून विसर्ग सुरू आहे. हे धरण विद्रुपा नदीवर असून, विद्रुपा नदीचे पाणी मोर्णा नदीला मिळते. यामुळे खडकी,कोन्हेरीसरप,बार्शिटाकळीसह मोर्णा धरणाच्या काठावरील गावकरी,नागरिकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
दरम्यान,शुक्रवार सांयकाळी ५ वाजतापर्यत काटेपूर्णा धरणात ८४.१९२ दशलक्ष घन मिटर म्हणजेच ९७.५० टक्के जलसाठा संचयित झाला आहे.पातूर तालुक्यातील मोर्णा,निर्गुणा धरणही शंभर टक्के झाले असून, मूर्तीजापूर तालु्क्यातील उमा बँरेजमध्ये ७६.१३ टक्के जलसाठा उपलब्ध झाला आहे.वाण धरणही शंभर टक्के पाण्याने भरले आहे.त्यामुळे यावर्षी कोणी मागणी केली नाही तरी सिंचनासाठी पाणी सोडण्यात येणार असल्याचे पाटबंधारे विभागाच्या सुत्राने सांगितले.