एकाच महिन्यात मिळणार दोनदा साखर
By Admin | Updated: August 19, 2014 01:17 IST2014-08-19T00:44:52+5:302014-08-19T01:17:02+5:30
दहा महिन्यानंतर जुलै महिन्यातील साखरेचा पुरवठा गेल्या आठवड्यात (ऑगस्टमध्ये) जिल्ह्यात झाला.

एकाच महिन्यात मिळणार दोनदा साखर
अकोला: सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत गेल्या दहा महिन्यानंतर जुलै महिन्यातील साखरेचा पुरवठा गेल्या आठवड्यात (ऑगस्टमध्ये) जिल्ह्यात झाला. जिल्ह्यातील शिधापत्रिकाधारकांना या साखरेचे वितरण सुरू करण्यात आले असतानाच ऑगस्ट महिन्यातील साखर पुरवठय़ाचा करानामादेखील गेल्या गुरुवारी झाला आहे. त्यामुळे एकाच महिन्यात जिल्ह्यातील गरिबांना दोनदा रास्त भावाच्या साखरेचा लाभ मिळणार आहे. सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत बीपीएल आणि अंत्योदय योजनेंतर्गत शिधापत्रिकाधारकांना दरमहा रास्त भावाच्या साखरेचे वितरण केले जाते. त्यासाठी शासनामार्फत जिल्ह्यातील शिधापत्रिकाधारकांना साखर वितरित करण्याकरिता दरमहा २ हजार ७८६ क्विंटल साखरेचा पुरवठा केला जातो; मात्र गेल्या सप्टेंबरपासून साखरेचा पुरवठा बंद झाला होता. त्यामुळे रास्तभाव दुकानांमधून मिळणार्या स्वस्त भावाच्या साखर लाभापासून जिल्ह्यातील शिधापत्रिकाधारकांना दहा महिने वंचित राहावे लागले. दरम्यान, शासनामार्फत वाराणसी येथील कंत्राटराकडून जुलै महिन्यातील २ हजार ७८६ क्विंटल साखरेचा पुरवठा गेल्या आठवड्यात (ऑगस्टमध्ये) करण्यात आला. उपलब्ध साठय़ातून जिल्ह्यातील शिधापत्रिकाधारकांना साखरेचे वितरण सुरू करण्यात आले असतानाच, ऑगस्ट महिन्यातील सणासुदीच्या अतिरिक्त साठय़ासह जिल्ह्यासाठी ३ हजार ६८५ क्विंटल साखर पुरवठा करण्याकरिता पुणे येथील बारामती अँग्रो लि.सोबत १४ ऑगस्ट रोजी जिल्हा पुरवठा विभागामार्फत करारनामा करण्यात आला आहे. त्यानुसार ऑगस्ट महिन्यातील साखरेचा पुरवठा होणार आहे. त्यामुळे एकाच महिन्यात जिल्ह्यातील गरिबांना दोनदा रास्तभावाच्या साखरेचा लाभ मिळणार आहे.