तिरंगी लढतीची चिन्हं
By Admin | Updated: June 14, 2014 23:30 IST2014-06-14T22:24:36+5:302014-06-14T23:30:37+5:30
सर्वच पक्षांमध्ये इच्छुक उमेदवारांची गर्दी झाली असली, तरी भाजप आणि भारिप-बहुजन महासंघात हे प्रमाण जास्त आहे.

तिरंगी लढतीची चिन्हं
बाळापूर : लोकसभा निवडणुकीचा निकाल लागताच विधानसभेसाठी इच्छुकांनी उमेदवारीसाठी मोर्चेबांधणी करण्यास सुरूवात केली आहे. सर्वच पक्षांमध्ये इच्छुक उमेदवारांची गर्दी झाली असली, तरी भाजप आणि भारिप-बहुजन महासंघात हे प्रमाण जास्त आहे. आजवर एकाही उमेदवारास सलग दुसर्यांदा कौल न देण्याचा इतिहास असलेल्या या मतदारसंघामध्ये यावेळी तिरंगी लढतीची चिन्हं दिसत आहेत.
बाळापूर विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी मिळविण्यासाठी भाजप, भारिप-बहुजन महासंघ आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरू आहे. भाजपमध्ये इच्छुक उमेदवारांची यादी लांबलचक आहे; मात्र त्यापैकी प्रबळ दावेदारांचा विचार केला तर, पक्षाचे जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात, आ. डॉ. रणजित पाटील, रणधीर सावरकर, माजी आमदार डॉ. जगन्नाथ ढोणे, भाजयुमोचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य हरिश अमानकर, माजी जिल्हाध्यक्ष मनोहरराव रहाणे, उद्योजक एकनाथराव दुधे आणि प्रा. विजयसिंह गहलोत यांची नावं चर्चेत आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार संजय धोत्रे यांच्यासाठी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते भाऊसाहेब फुंडकर यांनी दिवसरात्र एक केले. त्यांचे हे परिश्रम मतपेटीतून दिसून आले. बाळापूर विधानसभेचे प्रतिनिधीत्व भारिप-बमसंचे आमदार बळीराम सिरस्कार करीत असले, तरी लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघामध्ये भाजपला आघाडी मिळाली. या मतदारसंघात भाजप आणि भारिप-बमसंच्या मतांमध्ये तब्बल १0 हजारांचा फरक होता. फुंडकरांनी हे परिश्रम त्यांचे चिरंजीव अँड. आकाश फुंडकर यांच्या उमेदवारीसाठीच केले होते. त्यामुळे अँड. आकाश फुंडकर यांची दावेदारीही प्रबळ मानली जाते. याशिवाय आ. रणजित पाटील, तेजराव थोरात आणि रणधिर सावरकर यांनीही पक्षामध्ये जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली असून, त्यांच्यापैकी कुणालाही उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. यदाकदाचित पक्षस्तरावर हा मतदारसंघ शिवसेनेला सोडण्याचा निर्णय झालाच, तर शिवसेनेच्या वतीने कालीन लांडे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.
हा मतदारसंघ सध्या भारिप-बमसंच्या ताब्यात असून, या पक्षामध्ये विद्यमान आ. बळीराम सिरस्कार, प्रा. धैर्यवर्धन पुंडकर, डॉ. रहेमान खान आणि विजय लव्हाळे यांची नावं प्रामुख्याने चर्चेत आहेत. भारिप-बमसंमध्ये उमेदवारीबाबत शेवटच्या क्षणापर्यंत अनिश्चितता असते. गत निवडणुकीमध्ये प्रा. धैर्यवर्धन पुंडकर यांना पक्षाने उमेदवारी दिली होती. त्यांनी पक्षाचा एबी फॉर्म दाखल करून, प्रचारही सुरू केला होता; मात्र ऐनवेळी राजकारण शिजून त्यांना माघार घेण्यास भाग पाडण्यात आले होते. त्यामुळे बळीराम सिरस्कार हे भारिप-बमसंचे असले, तरी कायदेशीरदृष्ट्या त्यांची आमदारकी अपक्ष म्हणूनच गणली जाते. प्रा. फुंडकर यांच्या रूपाने भारिप-बमसंकडे एकमेव सक्षम ओबीसी चेहरा आहे. २00९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांच्या प्रयत्नांमुळेच या पक्षाला बाळापूर विधानसभा मतदारसंघात आघाडी मिळाली होती. सामान्य मराठा समाजाशी नाळ जुळलेला चेहरा म्हणून भारिप-बमसंमध्ये त्यांच्या नावाचा प्राधान्याने विचार होऊ शकतो.
काँग्रेस आघाडीमध्ये माजी आमदार लक्ष्मणराव तायडे, भाजपमधून काँग्रेसमध्ये आलेले माजी आमदार नारायणराव गव्हाणकर, नातिकोद्दीन खतिब, नगराध्यक्ष ऐनोद्दीन खतिब, नितीन देशमुख आणि पंढरी हाडोळे यांची नावं प्रामुख्याने चर्चेत आहेत. उमेदवारीसाठी लक्ष्मणराव तायडे आणि नारायणराव गव्हाणकर यांच्यात स्पर्धा होण्याची शक्यता आहे. तायडे हे काँग्रेसशी एकनिष्ठ असून, त्यांनी १९९ च्या निवडणुकीत या मतदारसंघामध्ये विजयही मिळविला होता. त्यामुळे त्यांची दावेदारी प्रबळ मानली जात आहे; मात्र लोकसभा निवडणुकीत हिरमोड झालेले नारायणराव गव्हाणकर यांना पक्षाने विधानसभा निवडणुकीचे आश्वासन दिल्याने, त्यांचा विचार कितपत होतो, हे येणार्या काळातच स्पष्ट होणार आहे. काँग्रेसने मुस्लिम कार्ड वापरण्याचे धोरण आखले, तर नातिकोद्दीन खतिब यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. गव्हाणकर यांना उमेदवारी मिळाली, तर भाजपसाठी ते त्रासदायक ठरू शकते. मनसेतर्फे विजय बोचरे आणि डॉ. प्रशांत लोथे यांची तर शिवसंग्रामतर्फे संदीप पाटील यांचं नाव चर्चेत आहेत.
बाळापूर विधानसभा मतदारसंघामध्ये बाळापूर, पातूर तालुका आणि अकोल्यातील उगवा सर्कलचा समावेश आहे. या मतदारसंघामध्ये आजवर पातूर तालुक्याला प्रतिनिधीत्व मिळालेले नाही.
पातूर आणि बाळापूर या दोन्ही नगरपालिका काँग्रेस-राकाँच्या ताब्यात आहेत. दोन्ही तालुक्यांमध्ये भाजप आणि भारिपचे प्रत्येकी पाच तर काँग्रेसचे दोन जिल्हा परिषद सदस्य आहेत; मात्र लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघामध्ये भाजपला ६३५८७, भारिप-बमसंला ५४४९७ तर काँग्रेसला ४३२१४ मतं मिळाली.
मतदारसंघामध्ये स्थानिक स्तरावर प्रचंड गटबाजी आहे. सर्वच पक्ष या गटबाजीने पोखरले आहेत. त्यामुळे मुस्लिम, बौद्ध, मराठा, आसामी आणि माळी समाजाचे प्राबल्य असलेल्या मतदारसंघाची निवडणूक सर्वच पक्षांना जेरीस आणणारी ठरते.