कॅफो, डीएसओ, डीआयओंची बदली
By Admin | Updated: June 1, 2017 01:31 IST2017-06-01T01:31:00+5:302017-06-01T01:31:00+5:30
कार्यकारी अभियंता गावंडे सेवानिवृत्त : मनपाचे सोळसे यांना मुदतवाढ

कॅफो, डीएसओ, डीआयओंची बदली
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : शासनाच्या वित्त विभागाच्या आदेशानुसार जिल्हा परिषदेच्या मुख्य लेखा व वित्त अधिकारी गीता नागर यांची ठाणे जिल्हा परिषदेत त्याच पदावर बदली झाली असून, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांची सातारा येथे्, जिल्हा क्रीडा अधिकारी शेखर पाटील यांची बुलडाणा येथे बदली झाली आहे. तर महापालिकेतील मुख्य लेखा परीक्षक सुरेश रतन सोळसे यांना प्रशासकीय कारणास्तव एक वर्ष मुदतवाढ देण्यात आली.
जिल्हा परिषदेतील मुख्य लेखा व वित्त अधिकारी नागर गेल्या चार वर्षांपासून कार्यरत होत्या. त्यांच्या काळातील अनेक प्रकरणे सभापती पुंडलिकराव अरबट यांनी पंचायत राज समितीपुढे तक्रारीतून मांडली आहेत. त्यातच समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहांना विभागप्रमुख म्हणून अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची मंजुरी नसणे, वसतिगृहांचे शासन मान्यता आदेश नसताना लाखो रुपयांची देयक अदा करण्याचा प्रकार घडला. त्यामध्ये त्यांच्यावर कारवाईसाठी कारणे दाखवा नोटिसही बजावण्यात आली, हे विशेष. सोबतच जिल्हा परिषद लेखा संहितेतील नियमानुसार जमाखर्चाचा हिशेब अर्थ व स्थायी समितीपुढे ठेवून त्याला मंजुरी घ्यावी लागते.
नागर यांनी त्यांच्या कार्यकाळात कधीच त्या जमाखर्चाला मंजुरी घेतली नसल्याचाही प्रकार घडला आहे. दरम्यान, त्यांची ठाणे जिल्हा परिषदेत बदली झाली.
कार्यकारी अभियंता गावंडे कार्यमुक्त
जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एस.पी. गावंडे ३१ मे रोजी सेवानिवृत्त झाले. त्यांना बुधवारी दुपारी कार्यमुक्त करण्यात आले. त्यांचा प्रभार अकोटचे उपविभागीय अभियंता वाठ यांच्याकडे देण्यात आला. मात्र, नैतिक जबाबदारी म्हणून पंचायत राज समितीच्या दौऱ्यामध्ये उपस्थित राहू, असे गावंडे यांनी सांगितले.