आगाराच्या जागेवर उभारणार व्यापारी संकुल!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2017 01:30 IST2017-06-01T01:30:24+5:302017-06-01T01:30:24+5:30
अकोला : गांधी-जवाहर बागेलगत असलेले बाजोरिया ग्राऊंड आणि टॉवरसमोरील आगार क्रमांक एकच्या जागेवर भव्य व्यापारी संकुल उभारण्याचा मानस महापालिकेचा आहे.

आगाराच्या जागेवर उभारणार व्यापारी संकुल!
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : गांधी-जवाहर बागेलगत असलेले बाजोरिया ग्राऊंड आणि टॉवरसमोरील आगार क्रमांक एकच्या जागेवर भव्य व्यापारी संकुल उभारण्याचा मानस महापालिकेचा आहे. त्यादृष्टीने या दोन्ही जागा ताब्यात घेण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर ठेवला जाणार आहे. यासाठी बुधवारी महापौर विजय अग्रवाल यांनी महापालिकेतील अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेऊन प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना दिल्या.
गांधी-जवाहर बागेलगत असलेल्या बाजोरिया ग्राऊंडचा आणि म.रा. परिवहन महामंडळ आगार क्रमांक-१ च्या जागेचा ताबा महापालिकेला देण्यात यावा. हे जर झाले तर महापालिकेला मध्य शहरात दहा एकराचा भव्य भूखंड उपलब्ध होईल. तीन ‘एफएसआय’मधून या ठिकाणी भव्य तीन मजली व्यापारी संकुलाची उभारणी करता येईल. रेडिरेक्टरच्या निविदा काढून महापालिका स्वावलंबी होऊ शकते. ४०-६० चा रेशो जरी धरला, तरी किमान पाचशे कोटींचे उत्पन्न येथून महापालिकेला मिळण्याची शक्यता आहे, असा प्रस्ताव तयार केला जात आहे. ७ जून रोजी मुख्यमंत्री फडणवीस अकोला दौऱ्यावर असताना त्यांच्यासमोर महानगर विकासाबाबत सात प्रस्ताव ठेवल्या जाणार आहेत. यामध्ये पहिला प्रस्ताव जागेचा आहे. त्यानंतर उर्दू शाळेच्या भाडेपोटी मिळणाऱ्या चार कोटींचा, पाणीपुरवठा कंत्रादारास पडणाऱ्या जीएसटीच्या भुर्दंडचा, हद्दवाढ झालेल्या भागांवरील ३१० कोटींच्या निधीचा, एलबीटीचे अनुदान वाढवून देण्याचा, अल्पदरात गरीब आणि दलित वस्तीमधील लोकांच्या घरकुलाविषयींच्या प्रस्तावांचा यामध्ये समावेश आहे. बुधवारी या सातही विषयांवरील प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू झाले.
यातील किती प्रस्तावांना मुख्यमंत्री हिरवी झेंडी देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. महापौर विजय अग्रवाल यांनी बुधवारी त्यांच्या कक्षात बोलाविलेल्या आढावा बैठकीत मनपा आयुक्त अजय लहाने, उपायुक्त समाधान सोळंके, सुरेश सुरोशे, सुरेश हुंगे, खान आदी विविध विभागातील अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.