ट्रॅक्टरच्या धडकेने विद्यार्थिनी ठार
By Admin | Updated: July 23, 2014 00:59 IST2014-07-23T00:59:04+5:302014-07-23T00:59:04+5:30
ट्रॅक्टरने धडक दिल्यामुळे एक १४ वर्षीय शाळकरी बालिका जागीच ठार

ट्रॅक्टरच्या धडकेने विद्यार्थिनी ठार
आकोट: ट्रॅक्टरने धडक दिल्यामुळे एक १४ वर्षीय शाळकरी बालिका जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना शहरातील कलदार चौकात मंगळवार २२ जुलै रोजी सायंकाळी ५.१५ च्या सुमारास घडली. या प्रकरणी पोलिसांनी ट्रॅक्टर जप्त केला आहे. २२ जुलै रोजी सायंकाळी शाळा सुटल्यानंतर १४ वर्षीय एकता ऊर्फ दिव्या अरुण मंजुळकर ही पोपटखेड मार्गावरील आपल्या घरी सायकलने जात होती. त्याचवेळी समोरून एमएच ३0 ए ८६७ क्रमांकाचा ट्रॅक्टर आकोटकडे येत होता. प्रत्यक्षदश्रींंनी सांगितल्यानुसार ट्रॅक्टर चालकाने कशासाठी तरी मागे पाहिले, तितक्यात दिव्या समोरून आली. ट्रॅक्टरचालकाला दिव्याची सायकल समोर दिसताच घाबरून त्याने ट्रॅक्टर वळविण्याचा प्रयत्न केला; परंतु दिव्याला जबर धडक बसली. त्या धडकेने ती जागीच गतप्राण झाली. बाजूलाच उभे असणारे विकी रक्षे, धनंजय गावंडे, नासीरभाई व राजू चौधरी या युवकांनी तिला लगेच ग्रामीण रुग्णालयात दाखल केले; परंतु त्याचा उपयोग झाला नाही. या घडामोडीत ट्रॅक्टरचालक ट्रॅक्टर सोडून पळून गेला. या संदर्भात दिव्याचे मामा राजेंद्र सदाशिव मावळकर यांनी आकोट पोलिसात तक्रार नोंदविली. दिव्या मंजुळकर ही स्थानिक नरसिंग कन्या शाळेची विद्यार्थिनी होती. याप्रसंगी माध्यमिक शिक्षणाधिकारी अशोक सोनवणे यांनी दिव्याच्या घरी जाऊन नातेवाईकांचे सांत्वन केले. वृत्त लिहिस्तोवर पोलीस कारवाई सुरू होती.