कपाशी पीक मोडून शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:14 IST2021-06-18T04:14:12+5:302021-06-18T04:14:12+5:30
खेट्री : पातुर तालुक्यातील पिंपळखुटा परिसरात कपाशी पिकावर अज्ञात रोगाने थैमान घातल्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे. ...

कपाशी पीक मोडून शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ!
खेट्री : पातुर तालुक्यातील पिंपळखुटा परिसरात कपाशी पिकावर अज्ञात रोगाने थैमान घातल्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे.
यंदा जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पावसाने दमदार हजेरी लावल्याने पिंपळखुटा परिसरातील बहुसंख्य शेतकऱ्यांनी जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात कपाशी पिकांची पेरणी केली होती. कपाशीचे बियाणे चांगले उगवले, परंतु अज्ञात रोगाने थैमान घातल्यामुळे शेतकऱ्यांनी कपाशी पीक मोडून सोयाबीन पिकाची दुबार पेरणी केली आहे.
पिंपळखुटा येथील गजानन बाबाराव देशमुख यांनी पंधरा एकर, रवींद्र महादेव देशमुख यांनी चार एकर, पुंडलिक लक्ष्मण दांदळे दोन एकर, गोपाल कवळे व नाजूकराव देशमुख आदी शेतकऱ्यांनी जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात कपाशी पिकांची पेरणी केली होती. परंतु अज्ञात रोगाच्या थैमानामुळे या शेतकऱ्यांनी कपाशी पीक मोडून सोयाबीन पिकाची दुबार पेरणी केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा फटका बसला आहे. आधी चार ते पाच वर्षांपासून सतत नापिकीमुळे व अस्मानी संकटामुळे शेतकऱ्यांच्या विविध पिकांमध्ये मोठ्या प्रमाणात घट होत असल्याने शेतकऱ्यांवर कर्जाचा बोजा दरवर्षी वाढत आहे. मागील वर्षाच्या कर्जाची परतफेड यावर्षी होईल, या आशेवर शेतकरी बँक व खासगी सावकाराकडून कर्ज काढून पिकांची पेरणी करीत आहेत. मात्र दरवर्षी काहीना काही शेतकऱ्यांवर संकट निर्माण होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर कर्जाचा बोजा दरवर्षी वाढतच चालला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना झालेली नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे.
पिंपळखुटा परिसरात कपाशी पिकावर अज्ञात रोग आल्याची माहिती मिळताच भेट देऊन कपाशी पिकाची पाहणी केली असून, औषध फवारणीबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले आहे. तसेच नुकसान भरपाईची तरतूद नाही, तरीही वरिष्ठांना माहिती देण्यात येईल.
- धनंजय शेटे, तालुका कृषी अधिकारी, पातूर
पिकांची पेरणी करण्याआधी कृषी विभागाकडून मार्गदर्शन करण्याची गरज आहे. परंतु पिंपळखुटा येथे पेरणीपूर्वी मार्गदर्शन करण्यात आले नाही.
- पुंडलिक लक्ष्मण दांदळे, शेतकरी, पिंपळखुटा
जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मी पंधरा एकरामध्ये कपाशी पिकाची पेरणी केली. परंतु अज्ञात रोग आल्याने कपाशी मोडून दुबार पेरणी केली आहे. त्यामुळे कपाशी पिकाच्या पेरणीसाठी केलेला दीड लाखांचा खर्च पाण्यात गेला आहे.
- गजानन देशमुख, शेतकरी, पिंपळखुटा