अज्ञात तापाचे थैमान; १५ दिवसात १५ गुरांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:15 IST2021-04-03T04:15:18+5:302021-04-03T04:15:18+5:30
तेल्हारा: तालुक्यातील जाफ्रापूर येथे अज्ञात तापाचे थैमान सुरू असून, १५ दिवसात तब्बल १५ गुरांचा मृत्यू झाला आहे. ...

अज्ञात तापाचे थैमान; १५ दिवसात १५ गुरांचा मृत्यू
तेल्हारा: तालुक्यातील जाफ्रापूर येथे अज्ञात तापाचे थैमान सुरू असून, १५ दिवसात तब्बल १५ गुरांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये गाय, बैल, म्हैस, शेळीसह इतर गुरांचा समावेश आहे. परिसरातील गुरांमध्ये या तापाची लक्षणे दिसून येत असल्याने पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहेत. संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन आजारी गुरांवर उपचार करावा तसेच पशुपालकांना झालेल्या नुकसानापोटी आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी तेल्हारा विकास मंचने दि.२ एप्रिल रोजी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
तेल्हारा तालुक्यातील जाफ्रापूर येथे अज्ञात तापाची साथ पसरली असून, पशुपालक हैराण झाले आहेत. अज्ञात तापाने १५ दिवसात १५ गुरांचा मृत्यू झाला असून, अनेक गुरे आजारी असल्याचे चित्र आहे. मृत्यूमध्ये गाय, बैल, म्हैस व शेळी यांच्यासह गुरांचा समावेश असल्याने पशुपालकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. अज्ञात तापाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे जाफ्रापूर परिसरातील पशुपालक, शेतकरी धास्तावले आहेत. कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे शेतकरी, शेतमजुरांवर उपासमारीची वेळ आली आहेत. शेतकऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. अशातच आता जाफ्रापूर येथे अज्ञात तापाचा कहर सुरू आहे. गुरांच्या रक्षणासाठी पशुधन विकास अधिकारी लक्ष ठेवून आहेत, परंतु त्यांचे उपचार कुचकामी ठरत असल्याचे पशुपालकांमध्ये बोलल्या जात आहे. तसेच बैलांमध्ये खुरी आजाराचे प्रमाण वाढले आहे. जाफ्रापूर येथील महादेवराव साबळे यांची दोन गुरे, जनार्धन बोदडे यांचे दोन गोऱ्हे, रामदास शेगोकार यांचा एक गोऱ्हा, गजानन साबळे यांची एक, गजानन वसो यांचा एक, गोपाळा बोदळे यांचे तीन व दोन गायी, संतोष बोदळे यांची एक शेळी असे, एकूण १५ गुरांचा मृत्यू झाला आहे.
शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी
गुरांना वाचविण्यासाठी वरिष्ठ पातळीवर विनाविलंब प्रयत्न करण्याची आवश्यकता असून, शासनाने पशुपालकांना विनाविलंब आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी विकास मंचने तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे दिलेल्या निवेदनातून केली आहे. यावेळी तेल्हारा विकास मंचचे अध्यक्ष राम फाटकर, स्वप्नील सुरे, मोहन श्रीवास, नितीन मानकर, सोनू सोनटक्के, गौतम दामोदर, गणेश पवार इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते. निवेदनाच्या प्रतिलिपी ना. बच्चुभाऊ कडू पालकमंत्री अकोला यांच्याकडे पाठविण्यात आल्या आहेत.