राष्ट्रसंतांच्या विचारांचा आजपासून तीन दिवस जागर

By Admin | Updated: December 12, 2014 01:14 IST2014-12-12T01:14:58+5:302014-12-12T01:14:58+5:30

राष्ट्रसंत विचार साहित्य संमेलनाचे आज उद्घाटन; अमेरिकेच्या समाजसेविका गेल ऑम्वेट यांची उपस्थिती.

Three days from the thoughts of the nationalities, Jagar | राष्ट्रसंतांच्या विचारांचा आजपासून तीन दिवस जागर

राष्ट्रसंतांच्या विचारांचा आजपासून तीन दिवस जागर

अकोला : दुसरे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य संमेलन शुक्रवार, १२ डिसेंबरपासून अकोल्यातील स्वराज्य भवनाच्या प्रांगणात सुरू होत आहे. या निमित्ताने भव्य मंडप टाकण्यात आला असून, संमेलनाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. १४ डिसेंबर अकोलेकरांना राष्ट्रसंतांच्या विचारांचा जागर अनुभवण्याची संधी मिळणार आहे. संमेलनाला अमेरिकेतील प्रसिद्ध समाजसेविका गेल ऑम्वेट उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.
संमेलनाची सुरुवात सकाळी ८ वाजता राजेश्‍वर मंदिरापासून ग्रंथदिंडीने होईल. ग्रंथपूजन अँड. दादा देशपांडे व माजी महापौर मदन भरगड यांच्या हस्ते होईल. साहित्य संमेलनाच्या सभागृहाला तुकारामदादा गीताचार्य यांचे नाव देण्यात आले आहे.
संमेलनाचे अध्यक्ष आचार्य हरिभाऊ वेरुळकर गुरुजी असून, उद्घाटन कविवर्य सुधाकर गायधनी यांच्या हस्ते होणार आहे.
याप्रसंगी आदर्श गाव हिवरेबाजारचे शिल्पकार पोपटराव पवार, आमदार हर्षवर्धन सपकाळ, आमदार बच्चू कडू, ज्येष्ठ श्रीगुरुदेव विचार प्रचारक सत्यपाल महाराज, डॉ. सुनील गंधे, ज्ञानेश्‍वर रक्षक यांच्यासह अकोल्यातील सर्व आमदार व अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
साहित्य संमेलनात युवक संमेलन, महिला संमेलन, भजन संमेलन, कृषी परिसंवाद, पत्रकारिता परिसंवाद, कायदेविषयक परिसंवाद, आरोग्यविषयक परिसंवाद, राष्ट्रीय कविसंमेलन आदींची मेजवानी रसिकांना अनुभवण्यास मिळणार आहे. सोबतच श्रमिक चळवळीचे नेते व विद्रोही चळवळीचे संस्थापक डॉ. भारत पाटणकर आणि अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांचेदेखील विचार रसिकांना ऐकता येणार आहे.

Web Title: Three days from the thoughts of the nationalities, Jagar