चार दिवसांत हजारो क्विंटल तूर खरेदीचे केंद्रांपुढे आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 01:12 IST2017-08-28T01:11:51+5:302017-08-28T01:12:11+5:30

चार दिवसांत हजारो क्विंटल तूर खरेदीचे केंद्रांपुढे आव्हान
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: शासनाच्या बाजार हस्तक्षेप योजनेंतर्गत सुरू असलेली तूर खरेदीची मुदत ३१ ऑगस्ट रोजी संपत आहे. तूर विक्रीसाठीचे टोकन आणि त्यानंतर बाजार समितीमध्ये नोंदणी केलेल्या ३ हजारांपेक्षाही अधिक शेतकर्यांची ६४ हजारांपेक्षाही अधिक क्विंटलची खरेदी चार दिवसात करण्याचे आव्हान जिल्हय़ातील पाच केंद्रांपुढे आहे.
शासनाने २६ जुलैपासून तूर खरेदी पुन्हा सुरू केली. त्यानंतरही मोठय़ा प्रमाणात टोकन घेतलेले शेतकरी केंद्रावर आले नाहीत. त्यामुळे नेमक्या किती शेतकर्यांची तूर घरात पडून आहे, याचा अंदाज घेण्यासाठी सर्व शेतकर्यांना १९ ऑगस्ट रोजी संबंधित कृषी बाजार समितीमध्ये उपस्थित राहून नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी केले होते. त्यानुसार जिल्हय़ातील पाचही केंद्रांवर त्या दिवशी ३,१४६ शेतकरी आले. त्यांच्याकडे ६४,३२७ क्विंटल तूर असल्याचे स्पष्ट झाले. त्या शेतकर्यांची तूर खरेदी केंद्रावर सुरू आहे. ३१ ऑगस्टपर्यंत तूर खरेदीची मुदत आहे. त्यामुळे बाजार समितीमधून टोकन घेतलेले शेतकरी आहेत की नाहीत, घरी तूर असलेल्यांना विक्री करावयाची आहे की नाही, ही बाब पडताळण्यात आली. त्यासाठी शेतकर्यांचा सात-बारा, टोकन, पंचनाम्याची प्रत तसेच इतर आवश्यक कागदपत्रे पाहूनच शेतकरी संख्या निश्चित झाली. बाजार समिती केंद्रात नोंद करणार्यांसोबतच इतरही शेतकरी केंद्रावर तूर आणत आहे. अर्थातच त्यांच्याकडे आधीचे टोकन आणि पंचनामे आहेत. त्यामुळे त्या सर्वांची तूर खरेदी केली जात आहे. आता ३१ ऑगस्टपर्यंत खरेदीसाठी चार दिवस उरले आहेत. या चार दिवसात ३0 ते ४0 हजार क्विंटल तूर खरेदी होण्याचा अंदाज व्यक्त होत आहे; मात्र ठरलेल्या मुदतीत ती होते की नाही, याबाबत साशंकता आहे. त्यामुळे किमान नोंदणी केलेल्या शेतकर्यांची तूर खरेदी व्हावी, यासाठी प्रशासनापुढे आव्हान आहे. त्यासोबतच नोंदणी न केलेल्या शेतकर्यांची तूर खरेदीही करावीच लागत आहे. त्यातून प्रशासनाच्या खरेदीच्या नियोजनावर परिणाम झाला आहे.
साठवणुकीसाठी जागेचाही वांधा
खरेदी केल्या जाणार्या तुरीची साठवणूक करण्यासाठी जागेचाही वांधा आहे. त्यामुळे जिल्हय़ातच साठा करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवलेला आहे. त्यावर उद्यापर्यंंत निर्णय होण्याची शक्यता आहे.
तूर खरेदीच्या मुदतीपर्यंत केंद्रे सुरू राहणार आहेत. त्यानंतर शासन निर्देशानुसार पुढील कार्यवाही केली जाईल. या काळात संपूर्ण तूर खरेदी करण्याचा प्रयत्न आहे.
- बजरंग ढाकरे, जिल्हा मार्के टिंग अधिकारी, अकोला.