एक हजार एकरातील पिके पाण्याखाली
By Admin | Updated: July 26, 2014 21:03 IST2014-07-26T21:03:33+5:302014-07-26T21:03:33+5:30
शेतांमध्ये पाणी साचल्याने अंदाजे १000 एकरावरील पिके पाण्याखाली गेली आहेत. तालुक्यात सरासरी १00 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

एक हजार एकरातील पिके पाण्याखाली
बाश्रीटाकळी: गत दोन दिवसांत धो धो बरसणार्या पावसाने बाश्रीटाकळी तालुक्यातील नदी-नाले तुडुंब भरले असून, शेतांमध्ये पाणी साचल्याने अंदाजे १000 एकरावरील पिके पाण्याखाली गेली आहेत. तालुक्यात सरासरी १00 मिमी पावसाची नोंद झाली आहे. गत दीड महिन्याचा अनुशेष भरून काढताना मंगळवार, २२ जुलैपासून सुरू झालेला पाऊस रात्रभर आभाळ फाटल्यासारखा बरसला. बुधवारीही रिपरिप थांबली नव्हती. त्यामुळे तालुक्यातील बहुतांश सर्वच नदी-नाल्यांना छोटे-मोठे पूर आले. तालुक्यात कोठेही पूर परिस्थिती नसली तरी या दमदार पावसामुळे शेतांमध्ये पाणी साचले. पाणी वाहून जाण्यासाठी मार्गच नसल्यामुळे अनेक शेतांमध्ये दोन-दोन फूट पाणी साचल्याने या शेतांना तळय़ांचे रूप आले आहे. नवांकुरित खरीप पिके पाण्याखाली गेल्याने शेतकरी धास्तावला आहे. तालुक्यात बाश्रीटाकळी परिसरात ११५ मिमी, खेर्डा भागात ९५ मिमी, पिंजर १00 मिमी, धाबा ७७ मिमी, राजंदा ६५ मिमी, महान ९३ मिमी पाऊस झाल्याची नोंद आहे. कान्हेरी परिसरातील २00 एकरावरील पिके पाण्याखाली बुडाली आहेत. महान, धाबा, राजंदा, शिरखेड, सुकळी, राहित-साहित, खेर्डा, हातोला, टेंभी, निंभारा, तिवसा, पुनोती, पाटखेड, मांगुळ, मोरगा काकड, टाकळी छबिले या गावांतील अनेक शेतकर्यांची पिके पाण्याखाली गेली आहेत. सदर पिके पाण्याखाली आणखी १0 ते १५ तास राहिल्यास ती सडण्याची दाट शक्यता शेतकर्यांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शेतकर्यांवर दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे.