कुत्र्याला ठार मारून चोरट्यांनी बैल पळविले !
By Admin | Updated: June 16, 2017 00:32 IST2017-06-16T00:32:12+5:302017-06-16T00:32:12+5:30
गुन्हा दाखल: दोन बैलजोड्यांची किंमत एक लाख ५० हजार रुपये

कुत्र्याला ठार मारून चोरट्यांनी बैल पळविले !
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: शेतातील गोठ्यात बांधलेल्या दोन बैलजोड्या चोरी करण्याच्या उद्देशाने अज्ञात चोरटे गोठ्यात घुसले. चोरट्यांना पाहून कुत्रा भुंकू लागला. कुत्र्याच्या भुंकण्यामुळे आपली चोरी पकडली जाईल, या भीतीने चोरट्यांनी आधी कुत्र्याला ठार मारून गप्प केले आणि नंतर गोठ्यातील दावणीवरील दोन बैलजोड्या सोडून पळ काढला. ही घटना बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास घुसर शेतशिवारात घडली.
घुसर येथे राहणारे शेतकरी शेख मोहम्मद शेख इमाम यांचे घुसर ते अकोला मार्गावर वाघोबा ढाब्याजवळ शेत आहे. शेतातच गोठा आहे.
या गोठ्यामध्ये त्यांची गुरे बांधलेली असतात, तसेच रखवालदारही तेथे असतो; मात्र बुधवारी रात्री पाऊस सुरू झाल्याने रखवालदार गोठ्याच्या मागे असलेल्या एका खोलीत झोपी गेला होता.
गोठ्यात दोन बैलजोड्या दावणीला बांधलेल्या होत्या. दरम्यान, अज्ञात चोरटे बैल चोरण्याच्या उद्देशाने गोठ्यात शिरले. यावेळी चोरट्याच्या अंगावर तेथीलच एक कुत्रा भुंकू लागला.
कुत्र्याच्या भुंकण्यामुळे आपली चोरी पकडली जाईल, या भीतीने चोरट्यांनी आधी कुत्र्याला ठार मारले आणि गोठ्यातील दावणीला बांधलेल्या दोन बैलजोड्या सोडून पळ काढला. सकाळी रखवालदार उठल्यावर त्याला कुत्रा मरून पडलेला दिसून आला आणि गोठ्यात बैलही दिसून आले नाहीत. त्याने ही माहिती मालकाला दिली. शेख मोहम्मद शेख इमाम यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, अकोट फैल पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.