लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: अकोला क्रिकेट क्लब मैदानासमोरील आयडीबीआय बँकेत चोरी झाल्याची घटना बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. सुदैवाने बँकेचे लॉकर फोडण्यात अज्ञात दरोडेखोर अयशस्वी झाले. त्यामुळे दरोडेखोरांना बँकेत दोन संगणक आणि पीसीओ घेऊन पोबारा केला. या प्रकरणात रामदासपेठ पोलिसांनी गुरुवारी सकाळी गुन्हा दाखल केला.अकोला क्रिकेट क्लब मैदानासमोर आयडीबीआय बँकेची शाखा आहे. या शाखेमध्ये अज्ञात दरोडेखोरांनी दरोडा घालण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यांच्या हाती रोख रक्कम लागली नाही. राधाकिसन तोष्णीवाल आयुर्वेद महाविद्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्याजवळील बँकेतील खिडकीची लोखंडी जाळी काढून चोरट्यांनी बँकेत प्रवेश करून काही रोख रक्कम हाती लागते का, हे पाहिले. लॉकर फोडण्याचा त्यांनी प्रयत्न केला; परंतु लॉकर फोडणे शक्य न झाल्याने, दरोडेखोरांनी बँकेतील दोन संगणक आणि पीसीओ लंपास केले. सकाळी बँकेचे व्यवस्थापक, कर्मचारी आल्यावर त्यांना बँकेत चोरी झाल्याचे समजले. त्यांनी रामदासपेठ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळावर जाऊन तपासणी केली. तसेच परिसरातील सीसी कॅमेरेसुद्धा तपासले; परंतु कॅमेऱ्यांमधील चित्रण अंधुक दिसत आहे. या प्रकरणात रामदासपेठ पोलिसांनी अज्ञात दरोडेखोरांविरुद्ध भादंवि कलम ४५७, ३८0 नुसार गुन्हा दाखल केला. पुढील तपास ठाणेदार मुकुंद ठाकरे यांच्या मार्गदर्शनात पीएसआय संदीप मडावी करीत आहेत. (प्रतिनिधी)
क्रिकेट क्लबसमोरील आयडीबीआय बँकेत चोरी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2020 14:31 IST