Theater Day Special: Akola's littele Girl Glitter In Bollywood | रंगभूमी दिन विशेष: अकोल्याच्या समृद्धीची बॉलीवूडमध्ये झेप!
रंगभूमी दिन विशेष: अकोल्याच्या समृद्धीची बॉलीवूडमध्ये झेप!

-  नितीन गव्हाळे

अकोला: मराठी, हिंदी चित्रपटसृष्टीत जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागते; परंतु गुणवत्ता, अभिनयाची क्षमता असेल तर तुम्हाला चित्रपटसृष्टीत जाण्यापासून कोणीच रोखू शकत नाही. अकोल्यातील अवघ्या नऊ वर्षाच्या चिमुकलीने फॅशन शो, नाटकांमध्ये अभिनयाची चुणूक दाखवित बॉलीवूडमध्ये दिमाखदार एन्ट्री केली. दिग्गज अभिनेते, अभिनेत्रीसोबत काम करून चित्रपटसृष्टीत बालकलाकार म्हणून नाव कमावत आहे. बालवयात एवढी मोठी मजलच नाहीतर तिच्या शॉर्ट फिल्मस्ने चार आंतरराष्ट्रीय पुरस्कारसुद्धा मिळविले आहेत.
या चिमुकलीचे नाव आहे, समृद्धी कृष्णा आसरकर. समृद्धी ही अकोल्यातील रामदासपेठेत राहणारे विवेक आसरकर यांची नात होय. वडील कृष्णा आसरकर हे बांधकाम व्यवसायाच्या निमित्ताने नागपूरात स्थिरावलेत. म्हणतात ना, बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. त्याप्रमाणे समृद्धी रूपाने, गुणाने, बोलके डोळे, अगदी चुणचुणीत अशी मुलगी असल्याने, तिचे सर्वत्रच कौतुक व्हायचे. तिला घ्यायला कुणीही पुढे धावायचे. समृद्धी तीन-चार वर्षांची झाल्यावर तिने एका फॅशन शोमध्ये भाग घेतला. नंतर शालेय नाटकांमध्ये ती सहभाग घ्यायची आणि वाहवा मिळवायची. तिच्यातील अभिनय क्षमता ओळखून तिचे वडील तिला मुंबईला नाटकांच्या आॅडिशनला घेऊन गेले आणि समृद्धीला नाटकामध्ये भूमिका मिळाली. अभिनय, संवादफेकीने समृद्धीची गुणवत्ता समोर आली. नऊ वर्षाच्या समृद्धीने आतापर्यंत तब्बल ३३ नाटकांमध्ये काम केले आहे. अनेक दिग्गज कलावंतासोबत जाहिरातींमध्ये ती झळकली. दोन वर्षांपूर्वी समृद्धीने बॉलीवूडमध्ये बालकलावंत म्हणून एन्ट्री केली. तिने आतापर्यंत सात चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यातील तीन चित्रपट रिलीज झाले असून, बॉक्स आॅफिसवर हे चित्रपट चांगलेच चालले. समृद्धी नागपूरच्या पोदार इंटरनॅशनल स्कूल बेसा येथे इयत्ता तिसरीत शिकते. अभिनयासोबतच अभ्यासातही समृद्धी समृद्ध आहे. बालवयात समृद्धीने बॉलीवूडमध्ये घेतलेली एन्ट्री आणि तिचा दिग्गज कलावंतांसोबतचा अभिनयाचा प्रवास थक्क करणारा आणि प्रेरणादायी असाच आहे.

या दिग्गज कलावंतांसोबत केले काम!
समृद्धीने सात बॉलीवूड चित्रपटांमध्ये बालकलावंत म्हणून भूमिका केल्या. या चित्रपटामध्ये अनेक दिग्गज कलावंतांसोबत काम करण्याचे भाग्य तिला लाभले. जॅकी श्रॉफ, तमन्ना भाटिया, प्रभास, प्रभू देवा, महेश मांजरेकर, संजय दत्त, कंगना रानौत आदी कलावंतांसोबत तिने खामोशी, जजमेंटल है क्या?, प्रस्थानम, देवीदास ठाकूर, द्रोपदी नामक चित्रपटांमध्ये काम केले आहे. सध्या समृद्धी अभिनेत्री सोनाक्षी सिन्हासोबत एका चित्रपटामध्ये काम करीत आहे.

 

Web Title: Theater Day Special: Akola's littele Girl Glitter In Bollywood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.