अकोला : मे चा तिसरा आठवडा सुरू झाला, पण एसटी कर्मचाऱ्यांना एप्रिलचा पगार नाही मिळाला

By Atul.jaiswal | Published: May 13, 2024 03:35 PM2024-05-13T15:35:21+5:302024-05-13T15:35:47+5:30

१,१८६ एसटी कर्मचारी वेतनाच्या प्रतीक्षेत : दैनंदिन खर्च भागविण्याची चिंता

The third week of May started but the ST employees did not get their April salary | अकोला : मे चा तिसरा आठवडा सुरू झाला, पण एसटी कर्मचाऱ्यांना एप्रिलचा पगार नाही मिळाला

अकोला : मे चा तिसरा आठवडा सुरू झाला, पण एसटी कर्मचाऱ्यांना एप्रिलचा पगार नाही मिळाला

अकोला : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) कर्मचाऱ्यांना दर महिन्याच्या ७ ते ८ तारखेपर्यंत मासिक वेतन अदा केले जाते, परंतु आता मे महिन्याचा दुसरा आठवडा उलटून, तिसरा आठवडा सुरू झाला असला, तरी कर्मचाऱ्यांना एप्रिल महिन्याचे वेतन मिळालेले नाही. राज्य सरकारकडून सवलतींची रक्कम न आल्याने एसटी कर्मचाऱ्यांचा पगार रखडला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पाच आगार, विभागीय कार्यालय व विभागीय कार्यशाळेतील १,१८६ एसटी कर्मचारी आर्थिक अडचणींचा सामना करीत आहेत. एसटी कर्मचाऱ्यांना प्रत्येक महिन्याच्या ७ ते १० तारखेदरम्यान वेतन देण्याचे न्यायालयाने नेमलेल्या त्रिसदस्यीय समितीने सरकारच्या वतीने न्यायालयात मान्य केले होते. पण, मे महिन्याची १३ तारीख उलटून गेली, तरी सरकारकडून सवलतीच्या प्रतिपूर्तीची रक्कम न मिळाल्याने एसटी कर्मचाऱ्यांना एप्रिल महिन्याचा पगार मिळालेला नाही, त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

मुलांची प्रवेश फी, घर खर्च कसा करावा?

सद्य:स्थितीत शाळा प्रवेशाची सर्वत्र धामधूम सुरू आहे. एसटीचे कर्मचारीही त्यांच्या पाल्यांना चांगल्या शाळेत शिक्षण देण्यासाठी धडपड करीत आहेत. तथापि, पगार रखडल्याने वेळेत प्रवेश फी न भरल्यास त्यांच्या पाल्यांना चांगल्या शाळेत प्रवेशापासून वंचित राहावे लागणार आहे. शिवाय, इतर दैनंदिन गरजांसाठी होणारा खर्चही कसा करावा, असा प्रश्न त्यांना पडला आहे.

शासनाने रोखली सवलत प्रतिपूर्तीची रक्कम

एसटी बसमध्ये विविध सवलतींचा आधार घेऊन प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या भाड्यापोटी प्रतिपूर्तीची रक्कम शासनाकडून एसटी महामंडळाला देण्यात येते. तथापि, शासनला एसटी महामंडळाकडून देय असलेली प्रवासी कराची रक्कम आधी भरा, मगच आम्ही सवलत प्रतिपूर्तीची रक्कम देऊ, अशी भूमिका शासनाने घेतली आहे.

जिल्ह्यातील एसटी कर्मचारी
विभागीय कार्यालय : ९६

विभागीय कार्यशाळा : १२७
अकोला आगार क्र. १ : २०९

अकोला आगार क्र. २ : २३९
अकोट : २१७

तेल्हारा : १७४
मुर्तिजापूर : १२४
एकूण : १,१८६


एसटी कर्मचाऱ्यांना आधीच वेतन कमी असून, तेदेखील वेळेवर मिळत नाही. आई-वडील यांच्या दवाखान्याचा खर्च, मुलांचे शिक्षण, घरखर्च, यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. उच्च न्यायालयाने दर महिन्याच्या १० तारखेपर्यंत एसटी कर्मचाऱ्यांना वेतन अदा करण्याबाबत आदेश देऊनही नियमितपणे १० तारखेपर्यंत वेतन अदा केले जात नाही. शासनाने एसटी कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन अदा करावे.

रवी अढाऊ, केंद्रीय कार्याध्यक्ष,
सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघ, महाराष्ट्र राज्य

Web Title: The third week of May started but the ST employees did not get their April salary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Akolaअकोला