उन्हाचा चटका आणि महावितरणचा फटका; १४३ हेक्टर वरील सोयाबीन होरपळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2022 16:47 IST2022-04-24T16:29:54+5:302022-04-24T16:47:31+5:30
Murtijapur News : उन्हाळी सोयाबीन वाणाचा म्हणावा तसा फायदा न होता प्रचंड आर्थिक नुकसान झाल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले हे निश्चित.

उन्हाचा चटका आणि महावितरणचा फटका; १४३ हेक्टर वरील सोयाबीन होरपळले
-संजय उमक
मूर्तिजापूर : उन्हाळी सोयाबीन उत्पादनाचा कधीच न झालेला प्रयोग यावर्षी शेतकऱ्यांनी केला. यासाठी संबंधित कृषी विभागाने शेतकऱ्यांना प्रवृत्त केले. तिसरे पिक घेण्याच्या उद्देशाने शेतकऱ्यांनी त्या पद्धतीने लागवड पण केली. परंतु झाले उलटेच वरुन उन्हाचा चटका व महावितरणच्या फटक्याने शेतकऱ्यांच्या हाती केवळ धुपाटणे आले.
तालुक्यात नगदी पीक म्हणून यावर्षी प्रथमच उन्हाळी सोयाबीन पिक घेण्यात येत आहे, पुरेसा जलसाठा असल्याने या वर्षी रब्बी हंगामात गहु, हरबरा, भाजीपाला आणि टरबूज खरबूज पिकांबरोबर उन्हाळी सोयाबीन पिकाला प्राधान्य देण्यात आले आहे. खरीप हंगामात सर्वाधिक सोयाबीन पिक घेतले जाते, हंगामाच्या शेवटी अवकाळीपावसाने शेतकरी अडचणीत येतो, सोयाबीन बियाणे उपलब्ध व्हावे म्हणून यावर्षी उन्हाळी सोयाबीन पिक वाण विकसित करून लागवडीसाठी कृषि विभाने शेतकऱ्यांना प्रोत्साहित करुन १४३ हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात आली. पाण्याच्या उपलब्धतेनुसार शेतकर्यांनी उन्हाळी सोयाबीनची लागवडही केली परंतू वीजपुरवठा अनियमित असल्याने पुरेसे पाणी पिकांना देणे शक्य झाले नाही, त्यातच उन्हाच्या चटक्याने, पिक शेंगा भरण्याच्या अवस्थेतच होरपळून केले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन लागवडीचा खर्चही निघणार नसल्याने खरीपाची पेरणी कशी करावी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. उन्हाळी हंगामात तालुक्यातील १४३ हेक्टर क्षेत्रावर मुख्यत्वे जेएस- ३३५, फुले संगम, एमएयुएस- १५८, एमएयुएस- १६२ या वाणांची पेरणी करण्यात आली. सोयाबीन पिकाचे वाढते दर व खरीप हंगाम मध्ये आवश्यक सोयाबीन बियाणे उपलब्ध रहावे ह्या बाबी लक्षात घेऊन, ज्या शेतकऱ्यांकडे उन्हाळ्यामध्ये ओलीताची व्यवस्था आहे, त्या शेतकऱ्यांना उन्हाळी हंगामात तिसरे पीक घेण्याकरिता कृषी विभागाने प्रवृत्त केले. मात्र उन्हाळी सोयाबीन वाणाचा म्हणावा तसा फायदा न होता प्रचंड आर्थिक नुकसान झाल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले हे निश्चित.
मागच्या वर्षी उन्हाळी सोयाबीन क्षेत्र नगण्य असणारे या वर्षी १४३ हेक्टर पर्यंत गेले आहे. सोयाबीन काढणी पासून ग्राम बिजोत्पादन च्या माध्यमातून जे शेतकरी घरचे सोयाबीन खरीप हंगाम करिता पेरणार आहेत प्रत्येक गावामध्ये सोयाबीन उगवण क्षमता तपासणी सुरु आहे. शिफारशी पेक्षा कमी उगवण क्षमता आलेले बियाणे म्हणूण उपयोग करू नये या बाबत जागृती करणे सुरु आहे. उन्हाळी सोयाबीन दर्जेदार असेल व उगवण क्षमता चांगली असेल तर खरीप हंगामात बियाणे म्हणूण वापण्यास हरकत नाही.
-अमृता काळे, तालुका कृषी अधिकारी, मूर्तिजापूर