पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांच्या मूल्यांकनाबाबत शिक्षक संभ्रमात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2020 11:21 AM2020-04-29T11:21:54+5:302020-04-29T11:22:01+5:30

शिक्षण विभागाने मूल्यांकनाबाबत ठोस सूचना न दिल्यामुळे विद्यार्थ्यांच्या मूल्यांकनाबाबत शिक्षक संभ्रमात आहेत.

Teachers confused about the assessment of students from 1st to 8th! | पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांच्या मूल्यांकनाबाबत शिक्षक संभ्रमात!

पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांच्या मूल्यांकनाबाबत शिक्षक संभ्रमात!

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे शाळा, महाविद्यालये बंद आहेत. शिक्षण विभागाने इयत्ता पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करून वर्षभरातील शैक्षणिक कामगिरीच्या आधारावर विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करून पुढील वर्गात प्रवेश द्यावा, असे निर्देश दिले आहेत; परंतु शिक्षण विभागाने मूल्यांकनाबाबत ठोस सूचना न दिल्यामुळे विद्यार्थ्यांच्या मूल्यांकनाबाबत शिक्षक संभ्रमात आहेत. निकाल लावावा तरी कसा? आणि विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात प्रवेश कसा द्यावा, असे प्रश्न शिक्षकांसमोर उभे झाले आहेत.
दरवर्षी १ मे रोजी किंवा ५ मेपर्यंत शाळांचे निकाल जाहीर होतात. परीक्षा घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या गुणांच्या आधारे पुढील वर्गात प्रवेश देण्यात येतो; परंतु यंदा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे प्रथमच इयत्ता पहिली ते नववीपर्यंतच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे पुढील वर्गात विद्यार्थ्यांना कसा प्रवेश द्यावा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. शिक्षण विभागाने कोणत्याही मार्गदर्शक सूचना न देता, केवळ विद्यार्थ्यांच्या वर्षभराच्या शैक्षणिक कामगिरीचा आढावा घेऊन मूल्यांकन करावे आणि पुढील वर्गात विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावा, असे म्हटले आहे. विद्यार्थ्यांचे कोणत्या आधारे मूल्यांकन करावे, याविषयी शिक्षकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. याबाबत शिक्षण संचालकांनी व्हिडिओ कॉन्फरसिंग घेतली होती; परंतु त्यातही मूल्यांकनाविषयी स्पष्ट करण्यात आले नाही. मूल्यांकनाचे स्वरूप कसे असणार, याची जबाबदारी राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन परिषदेकडे दिली आहे.
अद्यापपर्यंत राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन परिषदेने मूल्यांकनाच्या स्वरूपाबद्दल कोणत्याही सूचना दिलेल्या नाहीत. त्यामुळे शिक्षकांमधील संभ्रम कायम आहे. अनेक खासगी शाळांमध्ये शिकणाºया मुलांचे तीन ते सहा महिन्यांचे थकीत शुल्क आहे. संचारबंदीमुळे पालकांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. शैक्षणिक शुल्क भरल्याशिवाय पुढील वर्गांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार नाही, अशा सूचना शाळांकडून पालकांना दिल्या आहेत. त्यामुळे पालकांसमोरही पेच निर्माण झाला आहे.

इयत्ता पहिली ते नववीच्या निकालाबाबत व्हिडिओ कॉन्फरसिंग झाली आहे. शिक्षकांनी प्रथम सत्रामध्ये झालेल्या संकलित चाचणी आणि द्वितीय सत्रातील आकारित मूल्यमापनाच्या आधारे विद्यार्थ्यांचा निकाल तयार करावा. निकाल कधी जाहीर करावा, याबाबत लवकरच सूचना देण्यात येतील.
-डॉ. वैशाली ठग, शिक्षणाधिकारी
प्राथमिक विभाग.

Web Title: Teachers confused about the assessment of students from 1st to 8th!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.