शिक्षक घामाघूम; शाळेसाठी विद्यार्थीच सापडेना!
By Admin | Updated: June 6, 2014 01:17 IST2014-06-06T00:57:49+5:302014-06-06T01:17:45+5:30
अकोला मनपा शिक्षण विभाग उदासीन; आयुक्तांचे दुर्लक्ष

शिक्षक घामाघूम; शाळेसाठी विद्यार्थीच सापडेना!
अकोला : येत्या २६ जूनपासून शालेय सत्राला सुरुवात होणार आहे. मनपा प्रशासनाने बालवाडी व सेमी इंग्लिशचा प्रस्ताव लागू करण्यासाठी आखडता हात घेतल्याने शाळेची पटसंख्या टिकवण्यासाठी शिक्षकांवर घामाघूम होण्याची वेळ आली आहे. शाळा सुरू होण्यासाठी अवघ्या २0 दिवसांचा अवधी शिल्लक असताना, शिक्षकांना विद्यार्थीच मिळत नसल्याची परिस्थिती आहे. हीच स्थिती कायम राहिल्यास अनेक शाळांवर समायोजनाची कुर्हाड कोसळण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.
महापालिकेच्या शाळा येत्या २६ जूनपासून सुरू होतील. खासगी कॉन्व्हेंटच्या तुलनेत मनपा शाळेतील शिक्षणाचा दर्जा सुमार असण्यासाठी प्रशासनाचे बेजबाबदारपणाचे धोरण कारणीभूत असल्याचे उघड होत आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाप्रती राज्य शासन सकारात्मक निर्णय घेत असताना, स्थानिक स्वराज्य संस्था मात्र शिक्षण प्रणालीत कोणताही फेरबदल करण्यास तयार नसल्याची गंभीर परिस्थिती आहे. बहुतांश मनपा शाळेत गोरगरीब कुटुंबातील विद्यार्थी शिक्षणाचे धडे गिरवतात. या विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे व शासनाच्या योजनांचा वेळोवेळी लाभ पोहोचविणे शिक्षण विभागाचे नैतिक कर्तव्य आहे.
मनपाच्या रटाळ शिक्षण प्रणालीमुळे सर्वसामान्य कुटुंबांनी मनपाकडे पाठ फिरवली आहे. त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या पटसंख्येवर होत असून, मनपा शाळांसाठी विद्यार्थ्यांची शोध मोहीम राबवताना शिक्षकांची प्रचंड दमछाक होत आहे. यावर उपाय म्हणून शिक्षण प्रणालीत बदल करण्याची आवश्यकता असताना, या मुद्याकडे मनपा आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्यासह शिक्षणाधिकारी शाहीन सुलताना यांचे दुर्लक्ष होत आहे.