पश्‍चिम व-हाडात ४७ ठिकाणी तालुका क्रीडा संकुल

By Admin | Updated: December 28, 2014 00:38 IST2014-12-27T23:43:34+5:302014-12-28T00:38:01+5:30

क्रीडा क्षेत्राला चालना : बुलडाणा जिल्हा प्रगतीपथावर.

Taluka Sports Complex in 47 places in West-Bada | पश्‍चिम व-हाडात ४७ ठिकाणी तालुका क्रीडा संकुल

पश्‍चिम व-हाडात ४७ ठिकाणी तालुका क्रीडा संकुल

हर्षनंदन वाघ/ बुलडाणा : राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळाडूंना यशस्वी होण्यासाठी शासनाच्या विविध योजनेंतर्गत प्रत्येक जिल्ह्यात तालुक्याच्या ठिकाणी क्रीडा संकुलाची निर्मिती करण्यात येत आहे. त्यानुसार पश्‍चिम वर्‍हाडातील ५६ पैकी ४७ तालुक्यांच्या ठिकाणी क्रीडा संकुलाची कामे करण्यात येत आहेत. त्यात बुलडाणा जिल्ह्यातील १३ तालुक्यांचा समावेश आहे.
राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध स्पर्धेसाठी चांगले खेळाडू तयार व्हावेत, खेळाडूंमध्ये सांघिक भावना निर्माण व्हावी, या दृष्टिकोनातून महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा सुविधा निर्मिती योजना, जिल्हा वार्षिक योजना, महाराष्ट्र शासन व केंद्र शासनाच्या संयुक्त विद्यमाने राजीव गांधी खेळ अभियान तसेच स्थानिक पातळीवर बीओटी तत्त्वावर तालुक्याच्या ठिकाणी क्रीडा संकुलांचे निर्माण करण्यात येत आहे. त्यानुसार बुलडाणा जिल्ह्यातील १३ तालुक्यात क्रीडा संकुलाची निर्मिती करण्यात येत आहे. याशिवाय चिखली, मेहकर व मलकापूर येथे जलतरण तलाव, चिखली तालुक्यातील सवणा व मेहकर तालुक्यातील खंडाळा येथे राष्ट्रीय दर्जाचा इनडोअर हॉल उभारण्यात येणार आहे.
अकोला जिल्ह्यातील सात तालुक्यांपैकी पाच ठिकाणी, वाशिम जिल्ह्यातील ६ पैकी ४, अमरावती जिल्ह्यातील १४ पैकी १२ व यवतमाळ जिल्ह्यातील १६ पैकी १३ असे एकूण पश्‍चिम वर्‍हाडातील ५६ तालुक्यांपैकी ४७ तालुक्यात तालुका क्रीडा संकुलाची निर्मिती करण्यात येत आहे.
तालुक्याच्या ठिकाणी क्रीडा संकुलाची निर्मिती होत असल्यामुळे विविध खेळांना प्रोत्साहन मिळणार आहे. याशिवाय ग्रामीण भागातील खेळाडूंना आपल्या गुणवत्तेचे प्रदर्शन करण्यासाठी संधी मिळणार असल्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी सांगीतले.

*क्रीडा संकुलापासून वंचित तालुके
पश्‍चिम वर्‍हाडातील ५६ पैकी ९ तालुके तालुका क्रीडा संकुलापासून वंचित आहेत. त्यात अकोला जिल्ह्यातील अकोला, बाळापूर, वाशिम जिल्ह्यातील वाशिम, रिसोड, अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव, चिखलदरा व यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव, घाटंजी, झरीजामणी या तालुक्यांचा समावेश आहे.

Web Title: Taluka Sports Complex in 47 places in West-Bada