शेतसारा भरण्याच्या नावाखाली शेतकऱ्याकडून सातशे रुपयांची लाच घेणारा तलाठी अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2020 17:07 IST2020-05-22T17:07:28+5:302020-05-22T17:07:42+5:30
सातशे रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी त्याला लाच घेताना शुक्रवारी दुपारी रंगेहात अटक करण्यात आली.

शेतसारा भरण्याच्या नावाखाली शेतकऱ्याकडून सातशे रुपयांची लाच घेणारा तलाठी अटकेत
अकोला : बार्शीटाकळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या विझोरा येथील तलाठ्याने एका शेतकऱ्याला सातबारा देण्यासाठी शेतसारा भरण्याच्या नावाखाली सातशे रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी त्याला सातशे रुपयांची लाच घेताना शुक्रवारी दुपारी रंगेहात अटक करण्यात आली. ही कारवाई अकोलालाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली असून आरोपीस न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.
विझोरा येथील रहिवासी असलेल्या एका शेतकऱ्याला पीक कर्जाच्या कामासाठी सातबारा व आठ अ ची गरज होती. त्यासाठी संबंधित शेतकऱ्याने तलाठी हिम्मत रामभाऊ मानकर यांना सातबारा व आठ ’अ’ ची मागणी केली. मात्र सदर तलाठ्याने सातबारा व आठ ‘अ’ देण्यासाठी शेतसारा भरण्याच्या नावाखाली सातशे रुपयांच्या लाचेची मागणी केली. तक्रारदार शेतकऱ्यास लाच देणे नसल्याने त्यांनी या प्रकरणाची तक्रार १४ मे रोजी अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. या तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केली असता तलाठी हिंमत मानकर याने लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर शुक्रवारी दुपारी सातशे रुपयांची लाच घेण्याचे ठरल्यानंतर शेतकऱ्याने लाचेची रक्कम तलाठी मानकर यांच्या हातात देताच सापळा लावलेल्या अकोला एसीबीचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तलाठ्यास सातशे रुपयांच्या लाचेसह रंगेहाथ अटक केली. त्यानंतर सदर तलाठी विरुद्ध बार्शीटाकळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे पोलिस अधीक्षक श्रीकांत घीवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक एस. मेमाने, सचिन धात्रक, गजानन दामोदर, श्रीकृष्ण पळसपगार यांनी केली.