शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी उपाय करा; पीक कर्जासाठी शेतकऱ्यांना त्रास होता कामा नये!
By संतोष येलकर | Updated: May 31, 2023 18:40 IST2023-05-31T18:38:55+5:302023-05-31T18:40:35+5:30
विभागीय आयुक्तांचे निर्देश : जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्या प्रकरणांचा घेतला आढावा

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी उपाय करा; पीक कर्जासाठी शेतकऱ्यांना त्रास होता कामा नये!
संतोष येलकर, अकोला: जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्या प्रकरणांचा आढावा घेत, शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजना करुन, पीक कर्जासाठी शेतकऱ्यांना त्रास होता कामा नये, असे निर्देश अमरावती विभागीय आयुक्त निधी पांडेय यांनी मंगळवारी जिल्हा प्रशासनाला दिले.
दूरदृष्यप्रणालीद्वारे (ऑनलाइन) बैठकीत त्या बोलत होत्या. अमरावती विभागीय आयुक्त तथा वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनच्या अध्यक्ष निधी पांडेय यांनी शेतकरी आत्महत्याग्रस्त १४ जिल्ह्यातील कामाचा आढावा दूरदृष्यप्रणालीद्वारे आयोजित बैठकीत घेतला. त्यामध्ये अकोला जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्या प्रकरणांचा आढावा घेत, शेतकरी आत्महत्या प्रकरणांत मदतीची प्रकरणे तातडीने निकाली काढण्याच्या सूचना दिल्या.
शेतकरी आत्महत्या होऊ नये, यासाठी पिकांचे उत्पादन वाढविण्यासोबतच पिकांच्या उत्पादन वाढीसाठी येणारा खर्च कमी करण्यासंदर्भात आवश्यक असलेल्या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश विभागीय आयुक्तांनी दिले. येत्या खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर पीक कर्जासाठी शेतकऱ्यांना त्रास होणार नाही, याबाबतची खबरदारी घेऊन, शेतकऱ्यांना तातडीने पीक कर्ज उपलब्ध करुन देण्याचे निर्देशही विभागीय आयुक्त पांडेय यांनी दिले. या ऑनलाइन बैठकीत प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी डाॅ. शरद जावळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी किरवे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक सिन्हा, जिल्हा उपनिबंधक कार्यालयाचे प्रतिनिधी आदी संबंधित अधिकारी सहभागी झाले होते.