तहसील कर्मचाऱ्यांची धावाधाव

By Admin | Updated: August 14, 2014 01:53 IST2014-08-14T01:45:11+5:302014-08-14T01:53:36+5:30

उमरगा : येथील तहसील कार्यालयाच्या विविध विभागाला मंगळवारी जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी अचानक भेट देवून तपासणी केली.

Tahsil employees' raid | तहसील कर्मचाऱ्यांची धावाधाव

तहसील कर्मचाऱ्यांची धावाधाव




उमरगा : येथील तहसील कार्यालयाच्या विविध विभागाला मंगळवारी जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी अचानक भेट देवून तपासणी केली. कामात कामचुकारपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात येवून, शासकीय कामात त्रुटी आढळून आलेल्या कर्मचाऱ्यांचीही त्यांनी कानउघाडणी केली. दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी तहसील कार्यालयाला अचानक भेट दिल्यामुळे कर्मचाऱ्यांची चांगलीच धावपळ उडाल्याचे दिसून आले.
मंगळवारी दुपारी दोन ते अडीच वाजण्याच्या सुमारास जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी अचानकपणे येथील तहसील कार्यालयाला भेट दिली. जिल्हाधिकारी प्रत्यक्ष आपल्या टेबलासमोर आल्याचे दिसताच घामाघूम झालेल्या कर्मचाऱ्यांनी घाम पुसायला सुरुवात केली. उपविभागीय अधिकारी रवींद्र गुरव, तहसीलदार उत्तमराव सबनीस, नायब तहसीलदार जोशी, बी.पी. गायकवाडसह तहसीलचे अव्वल कारकूनासह कर्मचारी उपस्थित होते.
येथील निवडणूक विभाग तसेच मतदार नोंदणी व रेकॉर्डरुमची पाहणी करुन या रुममधील कागदपत्रांची विशेष काळजी घेण्याचे आदेश यावेळी देण्यात आले. संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ, वृद्धापकाळ वेतन योजना, कोषागार विभाग, पुरवठा, संकीर्ण, भूसंपादन, आवक जावक, लेखा विभाग, सेतू सुविधा, रोजगार हमी योजना, पूनर्वसन आदी विविध विभागाची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. संजय गांधी निराधार योजना, रेकॉर्ड या विभागातील कामात त्रुटी असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. नोंद वह्या अद्यावत ठेवणे, अभिलेख कक्षामधील ‘ड’ वर्ग कागदपत्रांचे विलगीकरण करुन स्कॅनिंगसाठी संचिका तयार ठेवणे, कार्य विवरण नोंद वह्या अद्यावत ठेवणे, सहा गठ्ठे पद्धतीने प्रत्येक विभागातील कागदपत्रे ठेवण्यात यावीत, कार्यालयाचे नियतकालीन परिक्षण नायब तहसीलदार यांनी करुन घेण्याचे आदेश त्यांनी यावेळी दिले.तसेच कामचुकापणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर प्रशासकीय कारवाईचे तहसीलदार व उपविभागीय अधिकाऱ्यांना त्यांनी सुचित केले. (वार्ताहर)



विविध शासकीय कामासाठी येथील तहसील कार्यालयाच्या परिसरात असलेल्या अंशकालीन कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी भेट देवून मागील १५ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या सेवेत कायम करण्याच्या मागणीचे निवेदन यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना संघटनेच्या वतीने देण्यात आले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी लागलीच नायब तहसीलदार जोशी यांना या कर्मचाऱ्यांची परीक्षा घेण्याचे आदेश देण्यात आले. यावेळी लक्ष्मण घुले, संजय पाचंगे, संजय साळुंंके, सुनिल कुलकर्णी, पुरुषोत्तम धुमाळ यांच्यासह इतर पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांनी तहसील कार्यालयात परीक्षा दिली. यावेळी दत्तात्रय मुळे, आयुब इनामदार या शेतकऱ्यांनी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले. दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी अचानक भेट दिल्याने कर्मचाऱ्यांची मात्र चांगलीच त्रेधातिरपीट उडाल्याचे दिसून आले.

Web Title: Tahsil employees' raid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.