अकोला मनपातील स्वच्छता निरीक्षक निलंबित
By Admin | Updated: February 24, 2015 01:13 IST2015-02-24T01:13:00+5:302015-02-24T01:13:00+5:30
आयुक्तांनी बजावले आदेश.

अकोला मनपातील स्वच्छता निरीक्षक निलंबित
अकोला : सफाई कर्मचार्यांनी नित्यनेमाने साफसफाई करण्याची गरज असून, त्यावर लक्ष ठेवण्यासाठी प्रशासनाने २८ स्वच्छता निरीक्षकांची नेमणूक केली. तथापि, शहरातील अस्वच्छता ही स्वच्छता निरीक्षकांना त्यांच्या जबाबदारीचा विसर पडल्याचे निदर्शक मानले जात आहे. या त्राग्यातूनच जवाहरनगर परिसराचे कामकाज पाहणारे स्वच्छता निरीक्षक प्रवीण खांबोलकर यांना निलंबित करण्याचा निर्णय सोमवारी मनपा आयुक्तांनी घेतला.
शहराच्या प्रत्येक भागात धुळीने माखलेले रस्ते, घाणीने गच्च भरलेल्या नाल्या-सर्व्हिस लाइन व रस्त्यावर ठिकठिकाणी साचणार्या कचर्यामुळे अकोलेकरांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे. अस्वच्छतेमुळे विविध साथरोगांनी अकोलेकरांना हैराण करून सोडले आहे.
शहरातील अस्वच्छता नागरिकांच्या जिवावर उठली असताना महापालिकेचा स्वच्छता व आरोग्य विभाग कमालीचा सुस्त आहे. सफाई कर्मचार्यांच्या कामावर देखरेख ठेवून त्यांच्याकडून साफसफाईची कामे करवून घेण्यासाठी मनपाने २८ स्वच्छता निरीक्षकांची नेमणूक केली; परंतु शहरातील एकूणच चित्र पाहता, स्वच्छता निरीक्षक झोपा काढतात की काय, अशी शंका येते. एकाच ठिकाणी अनेक वर्षांंपासून ठाण मांडणार्या स्वच्छता निरीक्षकांची उचलबांगडी करण्याचे वृत्त लोकमतमध्ये उमटताच प्रशासनाने दखल घेतली. २२ फेब्रुवारी रोजी पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी जवाहरनगर परिसरासह मुख्य रस्त्यांची अचानक पाहणी केली असता, नालीचे घाण पाणी रस्त्यावरून वाहत असल्याचे दिसून आले. या प्रकाराला जबाबदार असलेले स्वच्छता निरीक्षक प्रवीण खांबोलकर यांना निलंबीत करण्याचे आदेश आयुक्तांनी जारी केले.
*अस्वच्छता, उघड्यावर शौच करणे भोवणार
सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणे व उघड्यावर शौच करणार्यांची आता खैर नाही. शहरातील हॉटेल, खाद्यपदार्थाची विक्री करणारी ठिकाणे, रुग्णालये यांच्यासह उघड्यावर शौच करणार्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत. स्वच्छता निरीक्षकांनी मार्गदर्शक पुस्तिकेचा वापर करून कारवाई करावी, अन्यथा संबंधित स्वच्छता निरीक्षकांकडून दंडाची रक्कम वसूल केली जाईल, असा इशारा आयुक्त शेटे यांनी दिला.