पोळा चौकात महिलेची जाळून घेऊन आत्महत्या
By Admin | Updated: May 27, 2017 00:47 IST2017-05-27T00:47:28+5:302017-05-27T00:47:28+5:30
अकोला : पोळा चौकातील भोईपुरा येथील ४५ वर्षीय महिलेने स्वत:ला घरात जाळून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी रात्री १० वाजताच्या सुमारास घडली.

पोळा चौकात महिलेची जाळून घेऊन आत्महत्या
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : पोळा चौकातील भोईपुरा येथील ४५ वर्षीय महिलेने स्वत:ला घरात जाळून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी रात्री १० वाजताच्या सुमारास घडली. जळाल्याने जोरजोरात किंकाळ्यांचा आवाज झाल्याने परिसरातील नागरिकांनी दरवाजा तोडून महिलेच्या घरात प्रवेश केला. त्यानंतर अग्निशमन दलाने धाव घेऊन महिलेमुळे घरात लागलेली आग विझविण्याचा प्रयत्न केला; मात्र तोपर्यंत महिलेचा मृत्यू झाला होता.
भोईपुरा येथे लता नंदकिशोर कांबळे या त्यांचे पती आणि एका मुलासोबत राहतात. शुक्रवारी रात्री त्यांनी मुलास जेवण दिले. त्यानंतर त्या घराबाहेर येऊन बसल्या. काही वेळ गेल्यानंतर लता कांबळे या पुन्हा घरात गेल्या व आतून दरवाजा लावला. त्यानंतर काही क्षणातच घरातून किंकाळ्या व आगीचा मोठ्या प्रमाणात धूर निघताना शेजाऱ्यांना दिसला, त्यामुळे त्यांनी धाव घेत दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला; मात्र दरवाजा उघडला नाही. तातडीने अग्निशमन दल आणि जुने शहर पोलिसांना माहिती देण्यात आली. अग्निशमन दलाचे वाहन आल्यानंतर आग विझविण्यात आली. दरवाजा तोडून घरात प्रवेश केला असता लता कांबळे मृतावस्थेत आढळल्या. जुने शहर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला.