उपविभागीय अधिकाऱ्यांनी घेतले गोंधळवाडी गाव दत्तक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2017 20:22 IST2017-04-25T20:22:31+5:302017-04-25T20:22:31+5:30
पातूर- उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांनी बाळापूर उपविभागातील २०० गावांमधून दत्तक ग्राम म्हणून दत्तक घेतले आहे, त्यामुळे गावात वॉटर कप स्पर्धेच्या कामांना गती आली आहे.

उपविभागीय अधिकाऱ्यांनी घेतले गोंधळवाडी गाव दत्तक
वॉटर कप स्पर्धेनिमित्त श्रमदानाला आले उधाण
पातूर : नजीकच्या गोंधळवाडी या माळरानावरील आदिवासी गावात सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेची कामे जोरात सुरू असून, तेथील गावकऱ्यांचा उत्साह पाहता सदर गाव उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांनी बाळापूर उपविभागातील २०० गावांमधून दत्तक ग्राम म्हणून दत्तक घेतले आहे, त्यामुळे गावात वॉटर कप स्पर्धेच्या कामांना गती आली आहे.
गोंधळवाडी हे आदिवासी गाव माळरानावर वसलेले असून, या गावातील लोकांचा मुख्य व्यवसाय म्हणजे बिबे फोडणे व मोलमजुरी करण्याचाच आहे. येथील संपूर्ण शेत जमीन पूर्णत: कोरडवाहू, पाण्याचा प्रश्न बिकट अशी एकंदरीत स्थिती आहे. आजचा दिवस आपला कसा जाईल, या चिंतेत असलेले गावकरी कोरडवाहू शेतीसाठी पाण्याच्या बिकट प्रश्न असूनही ते जिद्द व मेहनतीने आयुष्य जगत आहेत; पण आज स्थितीत त्यांना ही परिस्थिती बदलायची आहे. अशातच त्यांना सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेची साथ मिळाली. गोंधळवाडीवासीयांनी श्रमदानाचा महापूर आणला होता. गावात एक व्यक्तीसुद्धा घरामध्ये दिसत नव्हता. संपूर्ण गाव हे श्रमदानासाठी आले होते. त्यांना उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे व तालुका कृषी अधिकारी मकासरे यांची साथ मिळाली. त्यांनी लहान मुलांपासून ते वृद्ध आजोबा, आजी यांची आस्थापूर्वक विचारपूस करून त्यांच्यासोबत श्रमदान केले. खडसे यांनी गोंधळवाडी येथील गावकऱ्यांची मेहनत व उत्साह पाहून बाळापूर विभागातील २०० गावांमधून सदर गाव दत्तक घेतले. तातडीने गावात कॅम्प लावून व स्वत: गावात हजर राहून सर्वांना जातीचे प्रमाणपत्र देण्याची घोषणा केली. इतर समस्या लवकरात लवकर सोडविण्याचीही गावकऱ्यांना ग्वाही दिली, तसेच मकासरे यांनी जलयुक्त शिवार योजनेमधून पूर्णपणे मदत करण्याचे आश्वासन दिले. सद्यस्थितीत जवळपास ३०० ते ४०० गावकरी, सरपंच, पाणी फाउंडेशनचे तालुका स्वयंसेवक नानवट, नवनाथ, ग्रामसचिव घोडके, कृषी सहायक अंधारे, महसूल विभागाचे नाईक, तलाठी खुर्सडे हे श्रमदान करीत आहेत. २५ एप्रिल रोजी श्रमदानातून कॅम्परमेन्ट बन्डिंग, सीसीटी बांध व वृक्षारोपणाचे खड्डे करण्यात आले.