विद्यार्थ्याच्या आत्महत्येने यंत्रणा झाली जागी

By Admin | Updated: November 24, 2015 02:09 IST2015-11-24T01:37:02+5:302015-11-24T02:09:30+5:30

विशालच्या कुटुंबियांची प्रशासकीय अधिका-यांनी घेतली भेट.

The student's suicide victimized the system | विद्यार्थ्याच्या आत्महत्येने यंत्रणा झाली जागी

विद्यार्थ्याच्या आत्महत्येने यंत्रणा झाली जागी

अकोला/रिधोरा : गणवेश आणि पुस्तकांसाठी पैसे नसल्याने आत्महत्येचा मार्ग पत्करणार्‍या विद्यार्थ्याच्या कुटुंबियांची प्रशासकीय यंत्रणेने सोमवारी विचारपूस केली. 'लोकमत'ने या प्रकरणाचे वृत्त प्रकाशित केल्यानंतर, महसूल यंत्रणेने बाळापूर तालुक्याच्या दधम येथील या कुटुंबाची माहिती गोळा केली. विशाल खुळे हा अकोला येथील महाराणा प्रताप खासगी विद्यालयात इयत्ता नववीत शिकत होता. शासनाची मोफत गणवेश आणि पाठय़पुस्तकाची योजना इयत्ता आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठीच असल्याने त्याला या योजनेचा लाभ मिळाला नाही. मात्र त्याला विद्यालयामार्फत प्रवासासाठी एसटी पास मिळाला होता. विद्यालय अनुदानित असल्याने शुल्काचाही प्रश्नच नव्हता; मात्र सतत दोन वर्षांपासून दुष्काळाचा सामना करताना त्याच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती खालावली. त्यामुळे गणवेश आणि पुस्तकांसाठी त्याच्या कुटुंबियांकडे कोणतीही सोय नव्हती. शिक्षणाचे ध्येय गाठण्यासाठी अखेर विशालनेच कंबर कसली. त्याने दिवाळीच्या सुटीमध्ये शेतमजुरी सुरू केली. त्याच्याकडे दोन विषयांची पुस्तके नव्हती. यासाठी त्याने मजुरी करून पैसे जमविणे सुरू केले; मात्र दुसरीकडे कुटुंबाची आर्थिक परिस्थिती दिवसेंदिवस बिकटच होत गेल्याने तो पुस्तकांची सोय करू शकला नाही. अखेर त्याने परिस्थितीपुढे हात टेकत रविवारी विषारी औषध प्राशन केले. यातच त्याचा मृत्यू झाला. 'लोकमत'ने हे वृत्त प्रकाशित केल्यानंतर विशालच्या कुटुंबियांची बाळापूरचे तहसीलदार समाधान सोळंके आणि तलाठी प्रशांत सायरे यांनी भेट घेतली. यावेळी खुळे कुटुंबाकडे किती शेती आहे, पीक किती झाले, पीक स्थिती, कर्ज आदींची माहिती त्यांनी घेतली. विशालचे वडील विश्‍वनाथ यांच्याकडे २ एकर शेती असून, त्यांनी सोयाबीन पेरले होते. *विशाल होता दु:खी आर्थिक परिस्थितीमुळे आवडत्या वस्तू मिळत नाहीत, ही बाब विशालला नेहमी बोचत असे. स्वत: शेतमुजरी करूनही नवीन कपडे तो विकत घेऊ शकला नाही. त्यामुळे तो निराश होता. एकूणच परिस्थितीमुळे तो खचला होता. परिणामी त्याने जीवन संपविण्याचा निर्णय घेतला. *नवीन ड्रेससाठी हट्ट विशालच्या विवाहित बहिणी दिवाळीनिमित्त घरी आल्या होत्या. त्याने नवीन ड्रेससाठी कुटुंबीयाकडे हट्ट धरला होता; मात्र पैसेच नसल्याने त्याचा हट्ट पूर्ण होत नव्हता.

Web Title: The student's suicide victimized the system