उद्यापासून शाळेत विद्यार्थ्यांचा किलबिलाट!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:20 IST2021-02-05T06:20:02+5:302021-02-05T06:20:02+5:30
कोरोना संसर्गामुळे सर्वच क्षेत्राला फटका बसला आहे. यामधून शिक्षण क्षेत्रही सुटले नाही. ऑक्टोबर महिन्यापासून कोरोनाचा आलेख खाली आल्याने ...

उद्यापासून शाळेत विद्यार्थ्यांचा किलबिलाट!
कोरोना संसर्गामुळे सर्वच क्षेत्राला फटका बसला आहे. यामधून शिक्षण क्षेत्रही सुटले नाही. ऑक्टोबर महिन्यापासून कोरोनाचा आलेख खाली आल्याने २३ नोव्हेंबरपासून इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग सुरू झाले. आता २७ जानेवारीपासून इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू होणार आहेत. त्यानुसार, मार्च महिन्यापासून बंद असलेल्या प्राथमिक शाळांमध्ये २७ जानेवारीपासून मुलांचा किलबिलाट पाहायला मिळणार आहे. स्थानिक पातळीवरील परिस्थिती लक्षात घेऊन शाळा व्यवस्थापन समिती, शाळा प्रशासन व मुख्याध्यापक हे शाळा सुरू करण्यासंदर्भात निर्णय घेणार आहेत. ग्रामीण भागातील शाळा सुरू करण्यासाठी पालकांच्या संमतीपत्राशिवाय, ग्रामपंचायतीचा ठरावसुद्धा लागणार आहे. ज्या शाळांचे निर्जंतुकीकरण, स्वच्छता, हॅण्डवॉश व इतर तयारी पूर्ण झाली असेल, शालेय व्यवस्थापन समितीची परवानगी मिळाली असेल, त्याच शाळा पहिल्या दिवशी उघडणार आहेत. चार तासिकांसाठी वर्ग सुरू राहणार असून, प्राधान्यक्रमाने इंग्रजी, गणित व विज्ञान विषय शिकविले जाणार आहेत.
फोटा: शाळा, विद्यार्थी
साडेतीन हजार शिक्षकांची काेरोना चाचणी
इयत्ता पाचवी ते आठवीचे एकूण ४ हजार ९६२ शिक्षक आहेत. त्यापैकी ३ हजार ५१२ शिक्षकांची कोरोनाची चाचणी करण्यात आली. त्यात सहा शिक्षकांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. अद्यापही जिल्ह्यातील १४५० शिक्षकांनी कोरोना चाचणी केलेली नाही, अशी माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली ठग यांनी दिली.
एकूण शाळा- १४५७
एकूण विद्यार्थी- ११६५९०
उद्यापासून इ. पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू होणार आहेत. पालकांकडून संमतीपत्र भरून घेण्यात आले. ज्या पालकांनी संमतीपत्र भरून दिले. त्या पालकांच्या मुलांनाच शाळेत प्रवेश दिला जाईल. शिक्षकांची कोरोना चाचणी करण्यात येत आहे. शाळांनी नियम व अटींचे पालन करावे.
-डॉ. वैशाली ठग, शिक्षणाधिकारी प्राथमिक
बऱ्याच कालावधीनंतर शाळा सुरू होत आहेत. घरी मुलांचा अभ्यास होत नाही. ऑनलाइन शिक्षणातही अडचणी येतात. मुलेही घरी राहून कंटाळली आहेत. त्यामुळे संमतीपत्र भरून मुलांना शाळेत पाठविणार आहे. नियमांचे पालन करण्याच्या सूचना मुलांना दिल्या आहेत.
-ज्ञानेश्वर साबळे, पालक