टिप्परची धडक; चिमुकला विद्यार्थी ठार
By Admin | Updated: August 23, 2014 02:04 IST2014-08-23T01:36:05+5:302014-08-23T02:04:32+5:30
आजोबासोबत सायकलवर शिकवणीला जाताना घडला अपघात; अकोल्यातील उमरी नाक्यावरील घटना

टिप्परची धडक; चिमुकला विद्यार्थी ठार
अकोला : भरधाव टिप्परने दिलेल्या धडकेमध्ये खामगाव तालुक्यातील माटरगाव येथील रहिवासी असलेल्या ६ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी ३.३0 वाजताच्या सुमारास उमरी नाक्यावर घडली. आजोबासोबत सायकलवर शिकवणी वर्गासाठी जात असताना हा अपघात घडला. अपघातामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी टिप्परवर दगडफेक केली. पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांनी ट्रक जप्त केला असून, चालक रमेश सुखदेव जाधव याला अटक केली.
लहान उमरीतील महादेव मंदिराजवळ राहणारे गणेश केशवराव देशमुख यांच्यासोबत जयेश मंगेश देशमुख (६) हा सायकलवर केला प्लॉटमधील स्वरूपा भगत यांच्याकडे शिकवणी वर्गासाठी जात होता. त्यांची सायकल उमरी नाक्यावरील श्रीहरी मार्केटजवळ आली असता, समोरून भरधाव येणार्या एमएच ३0 एल ४८२२ क्रमांकाचा टिप्परला पाहून गणेश देशमुख यांनी सायकल बाजूला घेण्याचा प्रयत्न केला; परंतु टिप्परने सायकलला धडक दिल्याने गणेश देशमुख व चिमुकला जयेश हे सायकलवरून खाली कोसळले आणि जयेश हा टिप्परच्या मागील चाकात आल्याने, त्याच्या डोक्याला जबर मार लागला. यात तो जागीच मरण पावला. या घटनेने संतप्त झालेल्या नागरिकांनी टिप्परवर दगडफेक करून टिप्परच्या काचा फोडल्या. सिव्हिल लाईन पोलिसांनी घटनास्थळावर पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली आणि टिप्पर जप्त करून चालकाला अटक केली.
*आणखी एक विद्यार्थी जखमी
गणेश गंगागिरी यांच्या मालकीच्या एमएच 30-एए-3033 क्रमांकाच्या ट्रकने दुपारी १२ वाजताच्या सुमारास सम्राट बार समोर दर्शन वासुदेव गवई (१५) याला धडक दिली. यात दर्शन गंभीर जखमी झाला. त्याला खासगी रूग्णालयात भरती केले. त्यानंतर गंगागिरी यांच्याच मालकीच्या दुसर्या ट्रकने चिमुकल्या जयेशचा बळी घेतला.