अस्थायी डॉक्टरांचा संप मागे; राज्यातील ४०० पेक्षा जास्त डॉक्टर झाले रुजू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2020 19:19 IST2020-11-06T19:19:39+5:302020-11-06T19:19:45+5:30
Strike of temporary doctors called off अस्थायी प्राध्यापक डॉक्टरांनी आंदोलनाचा पवित्र घेत सामूहिक रजा आंदोलन पुकारले होते.

अस्थायी डॉक्टरांचा संप मागे; राज्यातील ४०० पेक्षा जास्त डॉक्टर झाले रुजू
अकोला: अस्थायी प्राध्यापक डॉक्टरांची सेवा नियमित करण्यासंदर्भात राज्य शासनाने आश्वासन दिल्याने अस्थायी प्राध्यापक डॉक्टरांनी संप मागे घेतला आहे. गुरुवारपासून राज्यभरातील १८ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील ४०० पेक्षा जास्त अस्थायी डॉक्टर सेवेत रुजू झाले आहेत. मागील चार ते पाच वर्षांपासून राज्यातील सर्वच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अस्थायी सहायक प्राध्यापक म्हणून ४०० पेक्षा जास्त डॉक्टर कार्यरत आहेत. कोरोना काळात इतरांप्रमाणे जोखमीची कामे करूनही त्यांना वेतन वाढ झाली नाही. शिवाय, सेवा नियमित करण्यासंदर्भात केवळ आश्वासन देण्यात आले. त्यावर शासनाने अद्यापही ठोस निर्णय न घेतल्याने राज्यातील १८ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अस्थायी प्राध्यापक डॉक्टरांनी आंदोलनाचा पवित्र घेत सामूहिक रजा आंदोलन पुकारले होते. यापूर्वी १५ ऑक्टोबर रोजी डॉक्टरांनी प्रलंबित मागण्यांसाठी निदर्शने देत काळ्या फिती लावून कामकाज केले होते. डॉक्टरांच्या आंदोलनाचा प्रभाव रुग्णसेवेवरही पडू लागला होता. राज्य शासनाने बुधवारी अस्थायी डॉक्टरांची सेवा नियमित करण्यात येणार असल्याचे आश्वासन दिल्याने अस्थायी डॉक्टरांनी आंदोलन मागे घेतले. त्यामुळे अकोला जीएमसीतील २४ अस्थायी सहायक प्राध्यापकदेखील गुरुवारपासून सेवेत रुजू झाले.
वैद्यकीय सेवा झाली होती प्रभावित
अस्थायी प्राध्यापक डॉक्टर आयसीयू, ओपीडी, लॅब तसेच कोविड वॉर्डातही सेवा देत आहेत. आंदोलनादरम्यान या सेवेवर प्रभाव पडला असून, अनेक ठिकाणी प्रशिक्षणार्थींच्या भरवशावर हे वाॅर्ड चालविण्यात आल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.