बुलडाणा शहरातील चौकांमध्ये फलकांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2019 14:25 IST2019-09-07T14:24:57+5:302019-09-07T14:25:12+5:30
विधानसभेपूर्वी चौकांमध्ये फलकांची गर्दी झाली असल्याचे दिसून येत आहे.

बुलडाणा शहरातील चौकांमध्ये फलकांची गर्दी
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: जाहिरात फलकांच्या माध्यमातून पालिकेला कर मिळत असला तरी शहरातील चौकांचे नैसर्गिक सौंदर्य धोक्यात आले आहे. विधानसभेपूर्वी चौकांमध्ये फलकांची गर्दी झाली असल्याचे दिसून येत आहे. यामुळे अपघात घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अनेक फलक अनधिकृतरीत्या लावण्यात आले असून याकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
शहरातील प्रमुख चौक नेहमीच विविध राजकीय नेत्यांचे वाढदिवस, निवड, नियुक्ती, विविध उत्पादने व दुकानांच्या जाहिरातींनी गजबलेले दिसून येतात. यामध्ये बसस्थानकाजवळील संगम चौक, जयस्तंभ चौक, स्टेट बँक चौक, कारंजा चौक, त्रिशरण चौक, एडेड चौक, तहसील चौक व चिंचोले चौकाचा समावेश आहे. तात्पुरत्या स्वरूपात बॅनर लावण्यासाठी पालिकेच्या परवानगीची गरज असते. यासाठी पालिकेकडून कर आकारण्यात येतो. मात्र अनेक फलक अनधिकृतरीत्या लावण्यात येत असल्याचेही निदर्शनास येते. याकडे नगर परिषद प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.
लवकरच विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागणार असल्याने जवळपास सर्वच पक्षाचे नेते विविध कार्यक्रमांचे आयोजन करत आहेत. या कार्यक्रमांचे फलक मोठ्या प्रमाणात चौकाचौकात झळकत आहेत. सर्व बाजूने लागलेल्या मोठमोठ्या बॅनरमुळे या सर्व चौकांचे विदु्रपीकरण होत आहे. एवढेच नव्हे तर यामुळे वाहनधारकांचे लक्ष विचलीत होऊन अपघात घडण्याची शक्यताही निर्माण झाली आहे. शहराच्या सौंदर्यात पुन्हा भर घालण्यासाठी पालिका प्रशासनाने अनधिकृत फलक लावणाऱ्यांवर कारवाई करण्याची गरज आहे.
मुदत संपूनही अनेक बॅनर जैसे थे
एका नियोजित कालावधीसाठी बॅनर लावण्याची परवानगी पालिका प्रशासनाकडून देण्यात येते. मात्र गेल्या काही दिवसांपासून चौकांमध्ये मुदत संपूनही अनेक फलक जैसे थे असल्याचे दिसून येत आहे. एवढेच नव्हे तर आधीचे फलक कायम ठेवून दुसरे फलक लावण्यात येत असल्याचे प्रकारही सुरू आहेत. या सर्व प्रकाराकडे पालिकेचे दुर्लक्ष होत आहे. यामुळे पालिकेचा करही मोठ्या प्रमाणात बुडत असल्याचे वास्तव आहे.
शहरातील चौकांमध्ये विहित कालावधीसाठी फलक लावण्याची परवानगी पालिकेकडून देण्यात येते. यासाठी फलकाच्या साईजनुसार शुल्क आकरण्यात येते. मुदत संपलेले फलक आढळून आल्यास किंवा यासंदर्भात काही तक्रारी आल्यास पालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून सदर फलक काढून टाकण्याची कार्यवाही करण्यात येते.
-दीपक सोनुने,
अतिक्रमण विभाग, न. प. बुलडाणा