टोकनसाठी रास्ता रोको!
By Admin | Updated: May 23, 2017 01:15 IST2017-05-23T01:15:00+5:302017-05-23T01:15:00+5:30
बार्शीटाकळीत टोकन वाटप बंद केल्याने शेतकरी संतप्त

टोकनसाठी रास्ता रोको!
लोकमत न्यूज नेटवर्क
बार्शीटाकळी: नाफेडच्या तूर खरेदी केंद्रावर पुन्हा तुरीची खरेदी सुरू होणार आहे. त्यासाठी २२ मे रोजी शेतकऱ्यांना टोकनचे वाटप करण्यात आले. १५० टोकनचे वाटप केल्यानंतर बाजार समितीने वितरण बंद केल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी रात्री ९ वाजता रास्ता रोको आंदोलन केले. अधिकाऱ्यांनी मध्यस्थी केल्याने आंदोलन मागे घेण्यात आले तसेच सर्वच शेतकऱ्यांना टोकन देण्यात आले.
बार्शीटाकळी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या केंद्रावर नाफेडच्या वतीने तुरीची खरेदी करण्यात येत आहे. बाजार समितीच्या आवारात असलेली तूर खरेदी झाल्यानंतर शेतकऱ्यांना आपली नोंदणी करावी, असे आवाहन शासनाने केले होते. त्यानुसार २२ मेपासून टोकनचे वितरण करण्यात आले. बार्शीटाकळी येथेही सोमवारी टोकनचे वाटप सुरू करण्यात आले. टोकन घेण्यासाठी शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. भर उन्हात शेतकऱ्यांनी दिवसभर उभे राहून टोकन घेतले. सायंकाळी १५० टोकन घेतल्यानंतर बाजार समितीने टोकनचे वाटत बंद केले. त्यामुळे दिवसभर उन्हात राहूनही टोकन न मिळाल्याने शेतकऱ्यांनी रात्री ९ वाजता बाजार समितीच्या बाजूने जाणाऱ्या रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन सुरू केले. आंदोलनाची माहिती मिळताच बार्शीटाकळीचे तहसीलदार रवी काळे व ठाणेदार सतीश पाटील यांनी घटनास्थळावर धाव घेऊन शेतकऱ्यांची समजूत काढली. तसेच तहसीलदारांनी बाजार समितीस सर्वच शेतकऱ्यांना टोकन देण्याचे आदेश दिले.
त्यामुळे शेतकऱ्यांनी आपले आंदोलन मागे घेतले. आज दिवसभरात २७७ टोकनचे वितरण करण्यात आले असून, २४ मेपासून शेतकऱ्यांच्या तुरीची खरेदी सुरू करण्यात येणार असल्याचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव सतीश शेळके यांनी सांगितले.