जुन्यांना थांबवा, नव्यांना संधी द्या!
By Admin | Updated: August 19, 2014 01:22 IST2014-08-19T00:51:15+5:302014-08-19T01:22:42+5:30
काँग्रेस इच्छुकांमध्ये रस्सीखेच : पक्षश्रेष्ठींपुढे आवळला एकच सूर

जुन्यांना थांबवा, नव्यांना संधी द्या!
अकोला- काँग्रेसच्या विदर्भातील इच्छुकांच्या मुलाखती रविवारी मुंबईत आटोपल्या. विधानसभानिहाय सामूहिक मुलाखतींच्या कार्यक्रमात अकोला जिल्ह्यातील इच्छुकांनी पक्षश्रेष्ठींपुढे जिल्ह्यातील विकासाचा मुद्दा पुढे करीत जुन्यांना थांबवा, नवीन चेहर्यांना संधी द्या, असा एकच सूर आळवला. भाषा आणि सामाजिक स्थितीचे मुद्देही गाजले. विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून तिकिट मागणार्या इच्छुकांकडून त्यांचे म्हणणे पक्षातील २५ ते ३0 ज्येष्ठ नेत्यांनी ऐकून घेतले. यावेळी मतदारसंघनिहाय इच्छुकांनी त्यांचे म्हणणे मांडताना त्या-त्या मतदारसंघातील सामाजिक, राजकीय स्थिती आणि यापूर्वीच्या निवडणुकांचा इतिहास पक्षश्रेष्ठींपुढे उलगडला. सर्वच मतदारसंघातून एक प्रमुख मागणी पुढे आली आणि ती म्हणजे जुन्यांना थांबवून नवीन चेहर्यांना संधी देण्याची. त्यासाठी पराभवाच्या मालिकांचे पाढेही वाचण्यात आले. याशिवाय सामाजिक स्थितीबाबतही इच्छुकांनी त्यांची मतं मांडताना बाळापूर, अकोला पश्चिम या मतदारसंघात मुस्लीम आणि मारवाडी समाजातील उमेदवार दिल्यानंतरही काँग्रेसला आलेल्या पराभवाचा पाढा वाचण्यात आला. त्याजागी आता जिल्ह्यात मुस्लीम समाजाला प्रतिनिधित्व द्यायचे झाले तर आकोट मतदारसंघातून देण्याची मागणी पुढे आली. बाळापूर मतदारसंघातील इच्छुकांनी जुन्या आणि सातत्याने पराभूत होणार्यांना संधी देण्याऐवजी नवीन चेहर्यांना पुढे येण्याची संधी देण्याची मागणी झाली. जिल्ह्यात काँग्रेसची स्थिती बघता सुधारणा करण्याच्या दृष्टिकोणातून मतदारांपुढे तेच-तेच चेहरे पाठविण्यापेक्षा काही नवीन चेहर्यांना संधी देण्याचा सूर आळवण्यात आला. अकोला पूर्व मतदारसंघातून इच्छुक असलेल्या उमेदवारांनी पक्षश्रेष्ठींपुढे या मतदारसंघातील पराभवाच्या मालिकेचा पाढाच वाचला. मराठा बहुल मतदारसंघ म्हणून या मतदारसंघाची ओळख सांगितली जाते. असेल तरी मराठय़ांमध्ये येणारे मोठे घटकच येथे ३0 वर्षांंपासून वंचित राहत असल्याची मतं इच्छुकांनी मांडली.(प्रतिनिधी)