आदिवासी विभागाच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांना मिळाला अधिकृत दर्जा!
By Admin | Updated: April 23, 2015 02:14 IST2015-04-23T02:14:48+5:302015-04-23T02:14:48+5:30
बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मिळणार क्रीडा गुणांची सवलत

आदिवासी विभागाच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांना मिळाला अधिकृत दर्जा!
अकोला - आदिवासी विभागातर्फे घेण्यात येणार्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांना राज्याच्या क्रीडा विभागाने राज्यस्तरीय स्पर्धेचा अधिकृत दर्जा दिला आहे. २२ एप्रिल रोजी काढण्यात आलेल्या या आदेशाने आता या स्पर्धेत सहभागी झालेल्या दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना क्रीडा गुणांची सवलत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आदिवासी आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांसाठी १५, १७ आणि १९ वर्षे वयोगटात मुलामुलींसाठी आदिवासी विभागातर्फे राज्यस्तरापर्यंत क्रीडा स्पर्धेचे आयोजन केले जाते. या स्पर्धेला आदिवासी विभागाची मान्यता असली तरी राज्याच्या क्रीडा संचालनालयाची अधिकृत मान्यता नव्हती. त्यामुळे या स्पर्धेत सहभाग घेणार्या व विजयी होणार्या विद्यार्थ्यांंना दहावी, बारावीच्या परीक्षेत २५ वाढीव क्रीडा गुणांच्या सवलतीचा लाभ मिळत नव्हता. आदिवासी आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांकडे क्रीडाकौशल्य असूनही त्यांना सवलतीचा लाभ मिळू नये, ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन आदिवासी क्रीडा विभागातर्फे आयोजित राज्यस्तरीय स्पर्धेला क्रीडा विभागाची अधिकृत मान्यता देण्याचा निर्णय घेण्यात आला. *नोकरीत पाच टक्के आरक्षण आदिवासी विभागाच्या क्रीडा स्पर्धेत सहभाग घेणारे आणि विजयी होणार्या खेळाडूंसाठी २५ वाढीव क्रीडा गुणांसोबतच शासकीय सेवेत खेळाडूंकरिता राखीव ठेवलेल्या पाच टक्के आरक्षणाच्या सवलतीचाही लाभ मिळणार आहे.