विशेष पोलीस महानिरीक्षकांनी केले पोलीस परेडचे निरीक्षण

By Admin | Updated: January 22, 2016 01:30 IST2016-01-22T01:30:34+5:302016-01-22T01:30:34+5:30

पोलिसांनी सादर केल्या चित्तथरारक कवायती.

Special Inspector General of Police reviewed the police parade | विशेष पोलीस महानिरीक्षकांनी केले पोलीस परेडचे निरीक्षण

विशेष पोलीस महानिरीक्षकांनी केले पोलीस परेडचे निरीक्षण

अकोला: अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजीवकुमार सिंघल यांनी गुरुवारी पोलीस मुख्यालय मैदानावर आयोजित पोलीस परेडचे निरीक्षण केले. यावेळी पोलीस जवानांनी चित्तथरारक कवायती सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधले. गत दोन दिवसांपासून जिल्हय़ातील पोलीस ठाण्यांचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजीवकुमार सिंघल व त्यांच्या चमूकडून वार्षिक निरीक्षण करण्यात येत आहे. या निरीक्षणाचाच एक भाग म्हणून विशेष पोलीस महानिरीक्षकांनी गुरुवारी दुपारी पोलीस मुख्यालय मैदानावर पोलीस परेडचे निरीक्षण केले. परेडमध्ये शहरातील सर्वच पोलीस ठाण्यांचे जवान सहभागी झाले होते. परेडच्या निरीक्षणासोबतच सिंघल यांनी पोलीस कर्मचारी, अधिकार्‍यांचा गणवेश, कीटचे निरीक्षण केले. यावेळी त्यांच्यासोबत पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा होते. यावेळी पोलीस जवानांनी कायदा व सुव्यवस्था धोक्यात आल्यास पोलिसांकडून कोणती खबरदारी घेतली जाते, याचे प्रात्यक्षिक सादर केले; तसेच शहरात आगीची घटना घडल्यास पोलीस कर्मचारी घटनेला कसे सामोरे जातात, याचे प्रात्यक्षिकही सादर करण्यात आले. शहरामध्ये दहशतवादी हल्ला झाल्यास, त्यास कसे तोंड द्यावे. दहशतवाद्यांचा मुकाबला कसा करायचा, याचेसुद्धा पोलिसांनी प्रात्यक्षिक केले. पोलिसांच्या चित्तथरारक प्रात्यक्षिकांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर, शहर पोलीस उपअधीक्षक प्रदीप चव्हाण, शहरातील आठही पोलीस ठाण्यांचे ठाणेदार, कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Special Inspector General of Police reviewed the police parade