सोयाबीनने ओलांडला ५७०० रुपये प्रति क्विंटलचा टप्पा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 17:10 IST2021-03-27T17:10:28+5:302021-03-27T17:10:36+5:30
Soybeans crossed the Rs 5,700 per quintal mark बाजार समितीत सोयाबीनचे दर ५ हजार ७५० रुपये प्रति क्विंटल झाले आहे.

सोयाबीनने ओलांडला ५७०० रुपये प्रति क्विंटलचा टप्पा
अकोला : गेल्या काही महिन्यांपासून सोयाबीनच्या दरात तेजी कायम आहे. शासनाने सोयाबीनला ३ हजार ८८० रुपये प्रति क्विंटलचे दर घोषित केले आहे; मात्र बाजार समितीत सोयाबीनचे दर ५ हजार ७५० रुपये प्रति क्विंटल झाले आहे. त्यामुळे आतापर्यंत सोयाबीन विक्री न केलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
खरीप हंगामात सोयाबीन काढणीवर असताना अवकाळी पावसामुळे पिकाला फटका बसला. त्यामुुळे उत्पादनात मोठी घट झाली. सुरुवातीच्या काळात बाजार समित्यांमध्ये अल्प दराने सोयाबीन खरेदी केल्या जात होते. परिणामी, शेतकरी चिंतित होते. ब्राझील, अमेरीकेसारख्या सोयाबीन उत्पादक देशांमध्येही शेतमालाच्या उत्पादनात प्रचंड घट झाली. त्यामुळे सोयाबीनच्या मागणीत आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढ झाली. चीनकडूनही सोयाबीनची मागणी होत असल्याने देशातील बाजारात सोयाबीनच्या दरात तेजी येऊ लागली. याचा परिणाम विदर्भातील बाजारात दिसून येऊ लागला. त्यात अकोला जिल्ह्यातील बाजारातही सोयाबीनच्या दराने उच्चांक गाठला आहे. बाजारात सोयाबीनचे दर ५ हजार ७०० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. अकोला बाजार समितीत मागील दोन-तीन दिवसांपासून चांगल्या दर्जाच्या मालाला ५ हजार ७०० रुपयांपेक्षा अधिक दर मिळत आहे.